ऋतुजा भोसलेने ‘आयटीएफ’मध्ये दुहेरीतील जेतेपदाची पंचविशीही पूर्ण केली

दिगंबर शिंगोटे : पुण्याच्या ऋतुजा भोसलेने चीनच्या फँग्रान तियानच्या साथीत ताउस्ते (स्पेन) येथे झालेल्या महिलांच्या आयटीएफ स्पर्धेतील दुहेरीचे विजेतेपद पटकावले. यासह ऋतुजाने ‘आयटीएफ’मध्ये दुहेरीतील जेतेपदाची पंचविशीही पूर्ण केली.

दुहेरीच्या अंतिम लढतीत ऋतजा-फँग्रान यांनी अॅलाना पार्नाबी (ऑस्ट्रेलिया)-व्हिक्टोरिया रॉड्रिगेझ (मेक्सिको) यांच्यावर ६-२, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली. ही लढत १ तास १० मिनिटे चालली. पहिल्याच गेममध्ये अॅलाना-व्हिक्टोरिया यांनी सर्व्हिस ब्रेक करून चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर ऋतजा-फँग्रान यांना सलग चार गेम जिंकल्या. अर्थात, ऋतुजा-फँग्रान यांनी ४-१ अशी आघाडी घेतली. सहाव्या गेममध्ये अॅलाना-व्हिक्टोरिया यांनी बाजी मारली. मात्र, त्यानंतर सलग दोन गेम जिंकून ऋतुजा-फँग्रान यांनी पहिल्या सेटमध्ये बाजी मारली.

आव्हान राखण्यासाठी अॅलाना-व्हिक्टोरिया यांना दुसरा सेट जिंकणे गरजेचे होते. पहिल्या गेममध्ये ऋतुजा-फँग्रान यांनी बाजी मारली. त्यापाठोपाठ, त्यांनी ४०-० अशा आघाडीसह ब्रेक पॉइंट मिळवले होते. मात्र, अॅलाना-व्हिक्टोरिया यांनी झुंज देऊन गेम जिंकली. त्यापाठोपाठ, तिसऱ्या गेममध्येही अॅलाना-व्हिक्टोरिया यांनी बाजी मारली. त्यानंतर ऋतुजा-फँग्रान यांनी ४०-१५ अशा आघाडीसह ब्रेक पॉइंट मिळवले. ही संधी साधून ऋतुजा-फँग्रान यांनी २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर आपापल्या सर्व्हिस राखल्यामुळे नवव्या गेमअखेर ऋतुजा-फँग्रान यांच्याकडे ५-४ अशी आघाडी होती. अर्थात, आव्हान राखण्यासाठी अॅलाना-व्हिक्टोरिया यांना दहावी गेम जिंकणे गरजेचे होते. या गेममध्ये ऋतुजा-फँग्रान यांनी ४०-३० अशा आघाडीसह मॅच पॉइंट मिळवला होता. तो पॉइंट अॅलाना-व्हिक्टोरिया यांनी वाचवला. मात्र, त्यानंतर पॉइंट घेऊन ऋतुजा-फँग्रान यांनी जेतेपदाला गवसणी घातली.

ऋतुजाचे यश...

ऋतुजाचे हे महिला आयटीएफमधील दुहेरीचे २५वे जेतेपद ठरले. तिने २०१३मध्ये इटलीच्या कॅमिला रोसाटेलोच्या साथीत पहिले जेतेपद पटकावले होते. त्यानंतर, २०१४मध्ये ऋतुजाने कोरियाच्या किम डाबिनच्या साथीत दोन जेतीपदे मिळवली. २०१७-१८मध्ये ऋतुजाने प्रांजला यडलापल्लीच्या (भारत) साथीत तीन, तर मैयार शेरीफ (इजिप्त), कनिका वैद्य (भारत) आणि हिरोको कुवाता (जपान) यांच्या साथीत प्रत्येकी एक जेतेपद पटकावले. त्यानंतर २०१९, २०२० आणि २०२१मध्ये ऋतुजाने लॉरा पिगोसी (ब्राझील), एमिली वेब्ली स्मिथ (ब्रिटन) यांच्या साथीत प्रत्येकी दोन जेतीपदे, तर एयूडाइस चाँग (हाँगकाँग), मियाबी (जपान), सौजन्या बावीशेट्टी (भारत) यांच्या साथीत प्रत्येकी एक जेतेपद मिळवले.

त्यापाठोपाठ, २०२२ आणि २०२३मध्ये ऋतुजाने एरिका सेमाच्या (जपान) साथीत तीन जेतीपदे, तर सारा बेथ ग्रे (इंग्लंड), डेस्तानी (ऑस्ट्रेलिया) आणि अंकिता रैना (भारत) यांच्या साथीत प्रत्येकी एक जेतेपद मिळवले होते, तर २०२४मध्ये ऋतुजाने न्यूझीलंडच्या पेज हूरीगनच्या साथीत दोन जेतीपदे मिळवली, तर चीनच्या फँग्रानच्या साथीत एक जेतेपद मिळवले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-25T17:57:32Z dg43tfdfdgfd