केकेआर २५० पार... नरिन आणि सॉल्टकडून पंजाबची धुलाई, आयपीएलमध्ये धावांचा महापूर

कोलकाता : सुनील नरिन आणि फिल सॉल्ट या दोन्ही सलामीवीरांनी पंजाबच्या संघाला चांगलाच तडाखा दिला. या दोघांनी १३८ धावांची सलामी दिली आणि तिथेच केकेआर धावांचा डोंगर उभारणार हे स्पष्ट झाले होते. या दोघांनीही आपली अर्धशतकं झळकावली. त्यामुळेच केकेआरच्या संघाला यावेळी धावांचे शिखर गाठता आले. पण आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या त्यांना उभारता आली नसली, तरी त्यांनी विजयाचा भक्कम पाया मात्र नक्कीच रचला. नरिन आणि सॉल्ट यांच्या फटकेबाजीच्या जोरावर केकेआरला पंजाबपुढे २६२ धावांचे आव्हान ठेवता आले.

सुनील नरिन आणि फिल सॉल्ट यांनी पंजाबची गोलंदाजी सुरुवातीपासूनच फोडून काढली. त्यामुळे केकेआरच्या संघाने ३.५ षटकांतच आपले अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतरही नरिन आणि सॉल्ट दोघेही तुफानी फलंदाजी करत राहीले. त्यामुळेच केकेआरच्या संघाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये ६ षटकांत बिन बाद ७६ अशी मजल मारता आली होती. त्यावेळी नरिन ३८ आणि सॉल्ट हा ३५ धावांवर खेळत होता. नरिन यावेळी सॉल्टपेक्षा जास्त आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे फक्त २३ चेंडूंत नरिनने आपले अर्धशतक झळकावले, यामध्ये ८ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. केकेआरने आठव्या षटकातच शंभरी पार केली, म्हणजे ४८ चेंडूंत केकेआरच्या १०० धावा पूर्ण झाल्या होत्या. नरिनपाठोपाठ सॉल्टदेखील अर्धशतकासमीप आला होता.

सॉल्टने यावेळी आपले अर्धशतक २५ चेंडूंतच पूर्ण केले, यामध्ये ६ चौकार आणि तीन षटाकारांचा समावेश होता. ही जोडी आता किती धावा करणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती. पण यावेळी ११ व्या षटकात केकेआरच्या संघाला पहिला धक्का बसला. राहुल चहरने सुनील नरिनला बाद केले आणि पंजाबला पहिले यश मिळवून दिले. नरिनने यावेळी ३२ चेडूंत ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. नरिन बाद झाल्यावर सॉल्टही जास्त काळ टिकला नाही. सॉल्टने यावेळी ६ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर ३७ चेंडूंत ७५ धावा कुटल्या. हे दोघे बाद झाल्यावर केकेआर किती धावा करते, हे सर्वांना पाहायचे होते. कारण त्यानंतर आंद्रे रसेल आणि वेंकटेश अय्यर हे खेळपट्टीवर होते.

पंजाबने टॉस जिंकून केकेआरला फलंदाजीला आमंत्रित करत सर्वात मोठी चूक केल्याचे पाहायला मिळाले. कारण केकेआरच्या दोन्ही सलामीवीरांनी पंजाबला जोरदार तडाखा दिल्याचे पाहायला मिळाले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-26T16:13:11Z dg43tfdfdgfd