टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार नाही; संघ जाहीर होताच दिग्गज कर्णधाराने केले मोठे वक्तव्य

नवी दिल्ली: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने बुधवारी १५ जणांच्या संघाची घोषणा केली. भारतीय संघाच्या घोषणेला २४ तास होण्याच्या आधी एका माजी कर्णधाराने मोठी भविष्यवाणी केली आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या चार संघांची नावे जाहीर केली आहेत. इंग्लंडच्या या माजी खेळाडूने ज्या चार संघांची नावे सांगितली आहेत त्यात भारतीय संघाचे नाव नाही. वॉन हा नेहमी सोशल मीडियावरील त्याच्या वक्तव्याने चर्चेत असतो. अनेक वेळा तो भारतीय संघाविरुद्धची भूमिका किंवा टीका करत असतो.

मायकल वॉनच्या मते- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहचतील. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, टी-२० वर्ल्डकप २०२४साठी माझे चार संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज होय.

गेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने विजेतेपद मिळवले होते. त्याआधी त्यांनी २०१० साली टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यांतर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत त्यांनी जेतेपद मिळवले. वॉनने ज्या चार संघांची नावे घेतली आहे त्यापैकी द.आफ्रिकेला पहिल्या विजेतेपदाची प्रतिक्षा आहे. ऑस्ट्रेलियाने २०२१ तर वेस्ट इंडिजने देखील दोन वेळा विजेतेपद मिळवले आहे.

विशेष म्हणजे वॉनने सेमीफायनलमधील ज्या संघांची नावे सांगितली आहेत. ते सर्व संघ सुपर ८ च्या फेरीत एकाच ग्रुपमध्ये आहेत. वॉनच्या या पोस्टनंतर भारतीय चाहत्यांनी त्याला उत्तर दिले नसते तरच नवल. वॉनने टॉप ४ मध्ये पाकिस्तानला देखील स्थान दिले नाही. आशिया खंडातील दोन मोठ्या संघांना बाहेर केल्याने चाहत्यांनी त्याचा समाचार घेतला आहे.

अर्थात काही चाहते असे देखील आहेत ज्यांनी वॉनचा अंदाज योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते भारतीय संघाची निवड योग्य झालेली नाही. रिंकू सिंहला संघात न घेतल्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टी-२० वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, संजू सॅमसन, सूर्यकुमा यादव, शिवम दुबे, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-01T14:17:40Z dg43tfdfdgfd