प्रशिक्षकाने संघातून वगळल्याने नैराश्य, उदरनिर्वाहासाठी अंपायरिंग, आता गोलंदाजांना फोडतोय घाम, वाचा आशुतोष शर्माविषयी अधिक

पंजाब किंग्जसाठी फलंदाजी करणारा आशुतोष शर्मा सध्या चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याच्या २८ चेंडूत ६१ धावांच्या स्फोटक खेळीने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. त्याची टी-२० कारकीर्द खूपच मनोरंजक आहे. त्याने आतापर्यंत १९ सामन्यांमध्ये ५७५ धावा केल्या आहेत. परंतु त्याने मारलेल्या षटकारांची संख्या पाहून कोणालाही धक्का बसेल. आशुतोषने आतापर्यंत १९ सामन्यात ४३ षटकार मारले आहेत.

आशुतोष शर्माचा जन्म मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला तर तो इंदूरमध्ये वाढला. मध्य प्रदेशातील रतलाम शहरातील रहिवासी असलेला हा २५ वर्षीय खेळाडू वयाच्या १०व्या वर्षी इंदूरला गेला. आपल्या क्रिकेट टॅलेंटला वाव दिला. मर्यादित संसाधने असूनही आशुतोष शर्मा स्वतः सर्वकाही व्यवस्थापित करण्यास शिकला. बॉल बॉय आणि अंपायर म्हणून काम केले. आशुतोष शर्मा रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. यामुळे आयपीएल २०२४ च्या लिलावात पंजाब किंग्जने आशुतोष शर्माला २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले.

पण मोठा स्टार बनण्याचा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. २०१९ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशकडून खेळताना आशुतोषने २३३ धावा केल्या होत्या. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. ही चमकदार कामगिरी करूनही पुढच्या मोसमात त्याला संघात स्थान मिळाले नाही. यामुळे तो नैराश्यात गेला होता. नैराश्यातील कालावधीचे वर्णन करताना आशुतोष म्हणाला, "२०१९ मध्ये मी मध्य प्रदेशकडून खेळलेल्या शेवटच्या सामन्यात मी ८४ धावा केल्या होत्या. पुढच्या वर्षी एक व्यावसायिक प्रशिक्षक आला. ज्यांच्या स्वतःच्या आवडी-निवडी होत्या. त्यांना मी आवडलो नाही. त्यामुळेच मला संघातून बाहेर फेकण्यात आले. हा COVID-19 साथीचा काळ होता, त्यामुळे फक्त २० लोक एकत्र प्रवास करू शकत होते. मला फक्त हॉटेलमध्ये राहावे लागले.

आशुतोषने असेही सांगितले की, त्याला त्याच्या चुकांची कल्पना नव्हती. काहीही न बोलता त्याला संघातून वगळण्यात आले. आशुतोषने सांगितले की, ती तीन वर्षे त्याच्यासाठी खूप वाईट होती. आता त्याला आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवण्याची संधी मिळणार आहे. पंजाब किंग्जमध्ये शशांक सिंगसोबतची त्याची जोडी विरोधी संघांसाठी मोठी समस्या बनली आहे. आयपीएल २०२४ मध्ये आशुतोषने आतापर्यंत ४ सामन्यात ५२ च्या सरासरीने १५६ धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत ९ चौकार आणि १३ षटकार मारले आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-19T14:56:05Z dg43tfdfdgfd