विराट कोहलीचं चाललंय तरी काय, आरसीबीच्या संघातील खेळाडूही घाबरले

नवी दिल्ली : विराट कोहलीचं सध्या चाललंय तरी काय, हा प्रश्न पडला आहे. कारण विराट कोहली दमदार धावा करत आहे, पण दुसरीकडे आरसीबीच्या संघातील खेळाडूच त्याला घाबरत असल्याचे समोर आले आहे.

सोमवारी सनरायजर्स हैदराबाद व आरसीबीचा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. आरसीबीचा संघ हा सामना घरच्या मैदानावर जिंकण्यास पुन्हा असमर्थ ठरला. हैदराबादच्या फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई करत २८७ धावा केल्या आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त धावा करणारा संघ ठरला. सामन्यादरम्यान मैदानात विराट त्याचा संघातील गोलंदाजांवर नाराज असल्याचे दिसत होते व त्याची होणारी चिडचिडही लोकांसमोर आली. त्याच्या नाराजीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात विराटचा संयम सुटला. तो आरसीबीच्या संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर चांगलाच नाराज दिसत होत. तो कधी मैदानात जमिनीला लाथ मारताना, तर कधी सहकाऱ्यांवर ओरडत असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे आरसीबीच्या संघातील काही खेळाडूही घाबरल्याचे पाहायला मिळाले. यामुळे आरसीबीच्या संघातील वातावरणही बिघडल्याचे दिसत आहे आणि या सर्व गोष्टींचा परीणाम संघाच्या कामगिरीवर होत आहे.

विराट यंदाच्या हंगामात चांगल्याच फॉर्ममध्ये असून ऑरेंज कॅपही सध्या त्याच्याकडे आहे. हैदराबादविरुद्ध २८८ धावांचा पाठलाग करण्यासाठी विराटने आक्रमक ४२ धावा केल्या पण मयंक मारकंडेच्या चेंडूवर तो क्लीनबोल्ड झाला. विराटने २० चेंडूत ६ चौकार व २ षटकार मारले. विराट व फाफ यांनी ८० धावांची भागिदारी केली, पण विराटच्या विकेटनंतर आरसीबी संघातील मधल्या फळीतील फलंदाज एकामागोमाग आऊट होत गेले. त्यानंतर दिनेश कार्तिकची ३५ चेंडूतील ८३ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीने आरसीबीने २६२ धावा केल्या.

हैदराबादच्या फलंदाजांची स्फोटक गोलंदाजीची त्याबरोबरच आरसीबीच्या कमकुवत गोलंदाजीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हैदराबादचा फलंदाज ट्रेव्हिस हेडने १०२ धावा आणि हेनरिच क्लासेनने ६८ धावांमुळे हैदराबादने २० षटकात ३ बाद २८७ धावा केल्या. आरसीबीने सहा गोलंदाज मैदानात उतरवले होते त्यापैकी चार गोलंदाजांना चार षटकात ५० धावा पडल्या आहेत. आरसीबीच्या गोलंदाजावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पण यंदा आरसीबीकडे गोलंदाजीचे खुपच कमी पर्याय असल्याकारणाने सामना जिंकणे अवघड झाले आहे.

सोमवारी आरसीबी २५ धावांनी पराभूत झाली. आरसीबीचा एकूण सहा वेळा पराभूत झाली आहे व हा सलग पाचवा पराभव आहे. त्यामुळे यंदा गुणतालिकेत १० व्या क्रमांकावर म्हणजे सर्वात शेवटच्या स्थानी आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-17T15:24:32Z dg43tfdfdgfd