सामन्यापूर्वीच हार्दिक पंड्याची चिंता वाढली, लखनौच्या मॅच विनर खेळाडूची संघात एन्ट्री...

नवी दिल्ली: मुंबई इंडियन्स व लखनौ सुपरजायंट्स या दोन्ही संघासाठी आजची आरपारची लढाई असणार आहे. कारण प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी आता मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याची चिंता वाढली आहे. कारण लखनौच्या संघात आता मॅचविनर खेळाडूची एंट्री झाली आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या घडीला पराभवाच्या छायेत आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाला विजयाच्या वाटेवर कसे आणायचे, याचा विचार कर्णधार हार्दिक पंड्या करत असेल. पण या सामन्यापूर्वी लखनौच्या संघाने मुंबईला मोठा धक्का दिला आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वीच लखनौच्या संघात एका दमदार खेळाडूचा प्रवेश झाला आहे.

मयंकची आयपीएलध्ये उत्कृष्ट कामगिरी

मयंक यादवने याच वर्षी आयपीएलमध्ये लखनौ सुपरजायंट्स संघातून पदार्पण केले. मयंकने आपल्या गोलंदाजीने क्रिकेट विश्वातील दिग्गजांसोबतच क्रिकेटप्रेमींना प्रभावित केले आहे त्यामुळे त्याचे कौतुक सर्वत्र पहायला मिळत आहे. या युवा तेज गोलंदाजाने यंदाच्या आयपीएल पर्वात सर्वात जलद गोलंदाजी केली आहे. मयंकने एका सामन्यात १५६.७ किमी. प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी केली होती. आत्तापर्यंत त्याने ६ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

आज मयंक यादव खेळणार का?

मयंक दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नाही परंतु आजच्या सामन्यात खेळणार असल्याने लखनौ संघ व लखनौचे चाहत्यांसाठी सुखद बातमी आहे. लखनौचे गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मोर्कलने मयंक मुंबई विरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मोर्कलने म्हटले की, ' मयंक आता तंदुरुस्त आहे व तो सर्व फिटनेस चाचणीत पास झाला आहे. तो संघात परतणार असल्याने सर्व उत्साहित आहेत.'

मयंकने पंजाब व बंगळुरू संघाविरुद्ध पलटली बाजी

पंजाब विरुद्धच्या सामन्यात मयंकने जॉनी बेयरस्टो, प्रभुसिमरन सिंग व जितेश शर्मा यांची विकेट घेत सामना लखनौच्या बाजूने फिरविला. तसेच आरसीबी १८२ धावांचा पाठलाग करत असताना मयंकने ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन व रजत पाटीदार यांची विकेट घेत सामन्याची दिशाच बदलली. गुजरातविरुद्धच्या सामन्यात मयंक जखमी झाल्याने लखनौला एका जलद गोलंदाजाची कमतरता भासत होती.

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स असा सामना आज होणार आहे ज्यात मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सामना जिंकणे महत्त्वाचे असणार आहे. मुंबईकडून बुमराहची गोलंदाजी पहायला मिळणार, तर लखनौकडून मयंक यादव गोलंदाजी करायला उतरणार आहे. मयंक यादव आता तंदुरुस्त असल्याकारणाने तो आजचा सामना खेळणार असल्याचे सांगितले जात आहे. लखनौचा मॅच विनर खेळाडू मयंक यादव पुन्हा संघात परतल्याने लखनौ संघासाठी ही एक चांगली बातमी आहे. मयंक यादवच्या येण्याने मुंबई इंडिन्सची चिंता मात्र वाढली आहे.

आयपीएल गुणतालिकेत लखनौ सुपरजायंट्स पाचव्या क्रमांकावर आहे तर मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-30T13:13:34Z dg43tfdfdgfd