SURYAKUMAR YADAV: वर्ल्डकप सेमीफायनलच्या आधी सूर्यकुमारला मोठा धक्का, मानाचे स्थान गमावले; हार्दिकने केली कमाल, मिळाली गुड न्यूज

दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ताजी रँकिंग जाहीर झाली आहे. या ताज्या क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला मोठा झटका बसला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमारने टी-२० वर्ल्डकप सुरू असताना त्याचे स्थान गमावले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत आता ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर ट्रेव्हिस हेड अव्वल स्थानी पोहोचला आहे.

टी-२०च्या ताज्या क्रमवारीत हेड ८४४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर भारताचा सूर्यकुमार यादव ८४२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सूर्याच्या स्थानात घसरण झाली आहे. सूर्याने वर्ल्डकपमध्ये २,७,५०, ५३,६,३१ अशा धावा केल्या आहेत. पहिल्या १० खेळाडूंमध्ये सूर्यसोबत यशस्वी जयस्वाल असून तो ६७२ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा फिरकीपटू राशिद खान ७१९ गुणांसह अव्वर स्थानी आहे. तर अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू दुसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या टॉप १० मध्ये भारताचा एकमेव गोलंदाज अक्षर पटेल आहे. अक्षरचे ६४७ गुण असून तो आठव्या स्थानावर आहे. आधी तो नवव्या स्थानावर होता.

हार्दिकची मोठी उडी

ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचा हसरंगा २२२ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी २ स्थानांनी पुढे येत दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून त्याचे २१४ गुण आहेत. तर भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याने चार स्थानांची उडी घेत तो आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. हार्दिकचे २१३ गुण आहेत. ऑलराउंडरच्या यादीत हार्दिक वगळता अन्य कोणताही भारतीय खेळाडू पहिल्या १० मध्ये नाही.

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये ग्रुप आणि सुपर ८ फेरीतील लढती पूर्ण झाल्या असून आता सेमीफायनलच्या लढती होणार आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या चार संघांनी सेमीमध्ये प्रवेश केला आहे. पहिली सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात तर दुसरी भारत आणि इंग्लंड यांच्यात २७ जून रोजी होणार आहे. सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानने अनपेक्षित प्रवेश करत सर्वांना धक्का दिला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-26T11:15:16Z dg43tfdfdgfd