विराटला सुनील गावस्करांचं चोख उत्तर, म्हणाले तुम्ही ओपनिंगला येऊन ही गोष्ट करणार असाल तर

नवी दिल्ली: विराट कोहलीच्या स्ट्राइर रेटची जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर कोहलीने समालोचकांना सुनावले होते. पण आता कोहलीला चोख उत्तर दिले आहे ते भारताचे माजी कर्णधार समालोचक सुनील गावस्कर यांनी. गावस्कर यांनी ओपनिंग येऊन कोहली काय करतो, हे सांगत त्याला जोरदार उत्तरही दिले आहे.

विराट कोहलीची मुलाखत गेल्या आठवड्यापासून स्टार स्पोर्ट्सवर वारंवार दाखवली जात आहे. या मुलाखतीमध्ये विराटने त्याच्या स्ट्राईक रेटवरून टीका करणाऱ्या समालोचकांवर जोरदार निशाणा साधला. या मुलाखतीमध्ये विराट म्हणाला, "जे लोक स्ट्राईक रेट बद्दल बोलतात आणि मी फिरकी गोलंदाजी चांगली खेळत नाही असं म्हणतात, त्यांना मी एवढं सांगने की, माझ्यासाठी माझा संघ जिंकणं महत्त्वाचं आहे. मी १५ वर्षे सातत्याने कामगिरी करत आहे. संघासाठी मैदानात उतरत आहे आणि संघासाठी सामने जिंकले आहेत. जे स्वत: मैदानावर नाहीत त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून अशा गोष्टी बोलू नये, असे मला वाटते. माझ्याबद्दल लोकं कोणत्याही गोष्टीवर बोलू शकतात, परंतु जे मैदानात खेळतात किंवा खेळले आहेत, योग्य परिस्थितीची जाणव होऊ शकते, असे मला वाटते."

कोहलीने समालोचकांना चांगलेच सुनावले होते. त्यानंतर आता सुनील गावस्कर यांनी कोहलीला चोख उत्तर दिले आहे. सुनिल गावस्कर म्हणाले की, "जर तुम्ही सलामी करण्यासाठी येता आणि १४ व्या किंवा १५ व्या षटकात विकेट गमवता. त्यावेळी तुमच्या धावांचा स्ट्राईक ११८ असेल आणि तुम्हाला वाटत असेल की लोकांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवाव्यात तर ते कठीण आहे." गावस्कर यांनी कोहलीला उत्तर देताना स्टार स्पोट्सवर देखील टिका करताना पुढे मागे बघितले नाही. आयपीएलचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स चॅनेललाही त्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.

गावस्कर पुढे म्हणाले की, " आपण सगळ्यांनीच थोडे का होईना क्रिकेट खेळले आहे, पण आम्हाला जे दिसतं तेच आम्ही बोलतो. यामध्ये आमची आवड-निवड नसते. आम्हाला आवडलं किंवा न आवडलं तरी जे घडतंय त्यावर आम्ही बोलतो. त्यामुळे स्टार स्पोर्ट्सने ही मुलाखत पुन्हा एकदा दाखवली तर मला ते आवडणार नाही, कारण यामुळे आमच्यासारख्या समालोचकांवर प्रश्न उभा होतोय."

विराट कोहलीला यावेळी चांगलेच उत्तर सुनील गावस्कर यांनी दिले आहे. त्यामुळे आता कोहली सुनील गावस्कर यांच्यावर पलटवार करत उत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T16:33:40Z dg43tfdfdgfd