IND VS ENG : रोहितने सिद्धू याचं ऐकलं आणि भारत सामना जिंकायला लागला, पाहा असं नेमकं घडलं...

गयाना : इंग्लंडने भारताविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये दमदार फलंदाजी करायला सुरुवात केली होती. त्यावेळी इंग्लंड हा सामना जिंकेल, असे वाटत होते. पण त्याचवेळी भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी समालोचन करताना एक गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट रोहितने दुसऱ्याच मिनिटाला केली. त्यानंतर भारतीय संघ हा सामना जिंकायला लागला.

इंग्लंडचा सलामीवीर भारताच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत होता. अर्शदीप सिंगच्या तिसऱ्या षटकात तर बटलरने जोरदार आघाडी उघडली होती. त्यानंतर चौथ्या षटकात रोहित हा जसप्रीत बुमराहला गोलंदाजी देईल, असे सर्वांना वाटत होते. पण मैदानात मात्र तसे घडले नाही.

सिद्धू यांनी नेमकं काय सांगितलं, जाणून घ्या...

सिद्धू म्हणाले की, " इंग्लंडने भारताविरुद्ध जोरदार आघाडी उघडली आहे. जोस बटलर हा भन्नाट फटकेबाजी करत आहे. पण भारताला जर जोस बटलरला रोखायचे असेल आणि हा सामना जिंकायचा असेल तर त्यांनी एक गोष्ट करायला हवी. रोहित शर्माने लगेच वेगवान गोलंदाजांकडे चेंडू देणे बंद करायला हवे. रोहितने आता फिरकी गोलंदाजाच्या हाती चेंडू द्यावा. जर रोहितने हा बदल केला तर सामन्यात काही तरी बदल झाल्याचे पाहायला मिळू शकते." सिद्धू यांनी जेव्हा सांगितले तेव्हा अर्शदीपचे षटक संपायला आले होते. त्यानंतर एका मिनिटात रोहित शर्माने अक्षर पटेलला गोलंदाजीला आणण्याचा निर्णय घेतला. अक्षरने हातात चेंडू घेतला आणि त्यानंतर पहिल्याच चेंडूवर त्याने जोस बटलरला बाद केले. तिथेच हा सामना भारताच्या बाजूने फिरला. कारण बटलर बाद झाला आणि त्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडायला लागला. त्यामुळे सिद्धू यांनी जे सांगितले तो बदल रोहित शर्माने लगेच केल्याचे पाहायला मिळाले.

रोहित शर्माने यावेळी शिफारीने संघाचे नेतृत्व केले. भारताची धावसंख्या जास्त मोठी नक्कीच नव्हती. पण रोहितने यावेळी गोलंदाजीत चांगला बदल केला. अक्षरने यावेळी आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. अक्षरला कुलदीपची चांगली साथ मिळाली आणि या दोघांनी इंग्लंडचे कंबरडे मोडले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-28T14:23:46Z dg43tfdfdgfd