'मला माफ कर,' शाहरुख खानने मैदानातच हात जोडून मागितली माफी; आकाश चोप्रा म्हणाला 'अरे तू...'

IPL 2024: कोलकाता संघ (KKR) हैदराबादचा (SRH) पराभव करत थेट अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. कोलकाताने हैदराबादचा पराभव केल्यानंतर संघमालक शाहरुख खानचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. संघ जिंकताच शाहरुख खान सेलिब्रेशन कऱण्यासाठी सुहाना आणि अबराम यांच्यासह मैदानात उतरला होता. यावेळी शाहरुख खान चुकून लाईव्ह कार्यक्रमात घुसला. आपली चूक लक्षात येताच शाहरुख खानने समालोचन करमारे माजी क्रिकेटर्स आकाश चोप्रा, पार्थिव पटेल, सुरेश रैना यांची माफी मागितली.

 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये शाहरुख खान विजयी फेरी मारत असताना मैदानात उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन करत आहे. एका क्षणी लाईव्ह सुरु आहे याची कल्पना नसल्याने तो कॅमेऱ्यासमोर येतो. पण आपली चूक लक्षात येताच तो बाजूला होतो. यावेळी आकाश चोप्रा, पार्थिव पटेल आणि सुरेश रैना समालोचन करत होते. शाहरुख खान आकाश चोप्राला 'मला माफ कर' असं म्हणतो. त्यावर आकाश चोप्रा 'अरे..ठीक आहे. तू आमचा दिवस चांगला केलास' असं उत्तर देतो. 

शाहरुख खान यानंतर पार्थिव पटेल आणि सुरेश रैना यांची गळाभेट घेतो. तसंच पुढे जाताना पुन्हा एकदा हात जोडून माफी मागतो. सुहाना खान यावेळी शाहरुखच्या बाजूलाच असते. वडिलांचा झालेला गोंधळ पाहून तिला हसू अनावर होतं. यानंतर आकाश चोप्रा प्रेक्षकांना नेमकं काय झालं सांगतात. तो म्हणतो 'ओह...व्हॉट अ मॅन! महान! आपण लाईव्ह शोमध्ये येत आहोत हेदेखील त्याला समजलं नाही. त्याने माफी मागितली. पण मी म्हटलं, तू आमचा दिवस चांगला केलास. तू शोस्टॉपर आहे'.

शाहरुख खान आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा सह-मालक आहे. सुरेश रैनाने शाहरुख खानने गळाभेट घेतल्याचे फोटो इंस्टाग्रामला शेअर केले आहेत.  "आज नेहमी नम्र असणाऱ्या शाहरुखला भेटून छान वाटलं. सुपरस्टारचा दर्जा असूनही, तो प्रत्येक संवादात नम्रता दाखवत आपली जमिनीशी जोडून राहणारी वागणूक कायम ठेवतो. कोलाकाता फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल अभिनंदन," असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

याआधी कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने कशाप्रकारे शाहरुख खानची उपस्थिती संघाचा मूड बदलते याबद्दल सांगितलं होतं. "संघातील त्याची उपस्थिती सांघिक वातावरणात उत्साह वाढवते. संघाचा दृष्टिकोन आणि दृष्टीकोन आपोआप बदलतो,” असं अय्यर म्हणाला.

2024-05-22T06:54:16Z dg43tfdfdgfd