१४४ धावा, १८ षटकार... भारतीय मुळच्या खेळाडूने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, केला जागतिक विश्वविक्रम

एपिस्कोपी : सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सामने खेळले जात आहेत. अशातच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एस्टोनियाच्या साहिल चौहानने जागतिक विश्वविक्रम केला आहे. साहिल चौहानने आपल्या तुफानी खेळीने सोमवारी, १७ मे रोजी साइप्रस विरोधात सर्वात जलद अर्धशतकचा विक्रम मोडला आहे. तसेच युनिवर्स बॉस ख्रिस गेल याचा सर्वात जलद अर्धशतकचा रेकॉर्ड मोडला आहे. ख्रिस गेलने आयपीएल २०१३ मध्ये १७ चेंडूंत अर्धशतक केले होते तर साहिल चौहानने अवघ्या १४ चेंडूंत अर्धशतक केले आहे. त्याच्या या विक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. याच बरोबर त्याच्यावर कौतुकाचा पाऊस पडत आहे.

साहिल चौहानने नामीबियाच्या जन निकोल लोफ्टी-ईटन याचा सर्वात जलद शतकचा रेकॉर्डही मोडला आहे. नामीबियाच्या जन निकोल लोफ्टी-ईटन याने फेब्रुवारी २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ३३ चेंडूंत शतक ठोकले होते. पण एस्टोनियाच्या साहिल चौहानने साइप्रस विरोधात निकोलहून कमी चेंडूंत शतक लगावले आहे. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच कोणत्याही व्यावसायिक क्रिकेटमधील सर्वात जलद शतक ठरले आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत शतक

साहिल चौहानने टी-२० मालिकांमधील दुसऱ्या सामन्यात साइप्रसच्या विरोधात फक्त २७ चेंडूंत शतक लगावत दमदार कामगिरी केली आहे. साहिलने झुंजार खेळी करत १४ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले त्यानंतर त्याने उर्वरित १३ चेंडूंत शतक केले. १९२ धावांचा पाठलाग करत एस्टोनियाने ९ धावांवर दोन विकेट्स गमावल्या होत्या. चौथ्या नंबरवरील फलंदाज साहिल चौहान हा मैदानात उतरला त्याने खेळाची सुरूवात षटकाराने केली. त्यानंतर पुढील २ चेंडूंत त्याने १० धावा केल्या. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

साहिलने ४१ चेंडूंत ठोकले १४४ धावा

साहिल चौहानने ४१ चेंडूंत १४४ धावांची झुंजार खेळी खेळली. यात १८ षटकार आणि ६ चौकार यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. याच मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याला खातेसुद्धा उघडते आले नव्हते. पण दुसऱ्या सामन्यात त्याने ती कसर भरुन काढली. त्याने गोलंदाजांना चांगलेच धुतले आणि जागतिक रेकॉर्डची नोंद आपल्या नावावर केली. त्याने ३५१.२१ च्या स्ट्राइक रेटने आक्रमक फलंदाजी केली. १३ व्या षटकातच एस्टोनियाने १९४ धावा करत साइप्रसवर विजय मिळवत सामना आपल्या नावावर केला.

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जास्त षटकार

साहिल चौहान (एस्टोनिया) - १८

हजरतुल्लाह जजई (अफगाणिस्तान) - १६

फिन एलन (न्यूझीलंड) - १६

जीशान कुकीखेल (हंगेरी) - १५

गेलपासून डिव्हिलियर्स यांचा सुद्धा मोडला रेकॉर्ड

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता. डिव्हिलियर्सने ३१ चेंडूंत शतक लगावले होते. व्यावसायिक क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या जैक फ्रेजर मैकगर्कचा नावावर होता. जैकने मागील वर्षीच घरगुती सामन्यांत २९ चेंडूंत शतक लगावले होते. आयपीएल २०१३ मध्ये ख्रिस गेलने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते. पण साहिल चौहानने आपल्या विध्वंसक खेळीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-18T09:10:41Z dg43tfdfdgfd