T20 WORLD CUP 2024 : पाकिस्तानला अमेरिकेने झुंजवले, बाबर आझमवर पहिल्याच सामन्यात नामुष्कीची वेळ

न्यूयॉर्क : पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात अमेरिकेने चांगलेच झुंजवले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर तर पहिल्यात सामन्याच मोठी नामुष्की ओढवली. त्यामुळे पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा संघ किती पाण्यात आहे हे पाहायला मिळाले.

पाकस्तानची पहिली विकेट काढली ती मुंबईकर सौरभ नेत्रावळकरने. सौरभने यावेळी मोहम्मद रिझवानला ९ धावांवर बाद केले आणि पाकिस्तानला धक्का दिला. त्यानंतरच्या तीन षटकांत पाकिस्तानने आपल्या दोन विकेट्स गमावल्या आणि त्यामुळेच त्यांची ३ बाद २६ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण यावेळी बाबर आझम आणि शादाब खान यांनी पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शादाब यावेळी टी-२० स्टाइलने फटकेबाजी करत होता. पण बाबर मात्र यावेळी टी-२० सामन्यात कसोटी क्रिकेट खेळत असल्याचे पाहायला मिळाले.

शादाब खानने यावेळी २५ चेंडूंत १ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४० धावा साकारल्या. यावेळी शादाबचा स्ट्राइक रेट होता तो १६०.००. बाबरने यावेळी शादाबपेक्षा चार धावा जास्त केला. पण या ४४ धावा करण्यासाठी बाबर आझमने तब्बल ४३ चेंडू घेतले. ज्यामध्ये ३ चौकार दोन षटकारांचा समावेश होता. त्यामुळे बाबर यावेळी चांगलाच ट्रोल झाला. पाकिस्तान या सामन्यात १५० धावांचा टप्पा गाठणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

पाकिस्तानसाठी अखेरच्या षटकांमध्ये शाहीन शाह आफ्रिदी आणि इफ्तिकार अहमद यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळेच पाकिस्तानच्या संघाला यावेळी ७ बाद १५९ अशी धावसंख्या उभारता आली. आफ्रिदीने यावेळी १६ चेंडूंत १ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद २३ धावा केल्या. अहमदने यावेळी १४ चेंडूंत तीन चौकारांच्या जोरावर १८ धावा केल्या.

या सामन्यात अमेरिकेच्या गोलंदाजांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कारण सुरुवातीलाच त्यांनी पाकिस्तानचे तीन फलंदाज २६ धावांत बाद केले होते. त्यानंतर अमेरिकेच्या गोलंदाजांनी सातत्याने विकेट्स मिळवत पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. अमेरिकेकडून या सामन्यात नोशतुक केन्जिंगेने सर्वाधिक तीन बळी मिळवले, त्याला सौरभ नेत्रावळकरने दोन विकेट्स मिळवत चांगली साथ दिली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-06T17:31:50Z dg43tfdfdgfd