राजस्थान टॉपर पण हैदराबादचा संघच का ठरतोय सरस, आयपीएलचा सर्वात मोठा रेकॉर्ड जाणून घ्या

दिगंबर शिंगोटे : आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी कधीच घडले नव्हते, असे यंदाच्या आयपीएलमध्ये घडले आहे. यंदाच्या आयपीएल सामन्यांत जणू धावांचा पाऊस पडत आहे. इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला २००८मध्ये प्रारंभ झाला. आयपीएलमध्ये अनेकदा आपण संघाकडून दोनशेहून अधिक धावा झालेल्या पाहिल्या आहेत. मात्र, आयपीएलमध्ये अडीचशेहून अधिक धावा झालेल्या आपण क्वचितच पाहिल्या होत्या. पण या आयपीएलमध्ये आता मोठा विक्रम रचला गेला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने २०१३मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध ५ बाद २६३ धावा केल्या होत्या. आयपीएलमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. हा विक्रम अकरा वर्षे बेंगळुरू संघाच्या नावावर राहिला. यंदाच्या आयपीएलमध्ये हा विक्रम मोडला गेला. यंदाच्या आयपीएलमध्ये बेंगळुरूला सनरायझर्स हैदराबादने बेंगळुरूविरुद्ध २० षटकांत ३ बाद २८७ धावा करून नवा विक्रम प्रस्थापित केला.

यंदाच्या आयपीएलमध्ये एक वेगळा विक्रमही पाहायला मिळाला आहे. तो म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये १० वेळा संघांनी अडीचशेहून अधिक धावा केल्या आहेत. यात आघाडीवर हैदराबाद संघ आहे. हैदराबादने तीन वेळा अडीचशे धावांचा टप्पा पार केला आहे. यात हैदराबादने बेंगळुरुविरुद्ध ३ बाद २८७, मुंबई इंडियन्सविरुद्ध ३ बाद २७७ आणि दिल्लीविरुद्ध ७ बाद २६६ धावा केल्या आहेत. याशिवाय कोलकाता नाइट रायडर्स संघाने यंदाच्या मोसमात दोन वेळा अडीचशेहून अधिक धावा केल्या आहेत. यात एप्रिलच्या सुरुवातीला विशाखापट्टणमला कोलकाता संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ७ बाद २७२ धावा केल्या होत्या. त्यानंतर कोलकाताने पंजाब किंग्ज संघाविरुद्ध ‘इडन गार्डन्स’वर ६ बाद २६१ धावा केल्या.

बेंगळुरू संघानेही यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच अडीचशेहून अधिक धावा केल्या. विशेष म्हणजे बेंगळुरूने लक्ष्याचा पाठलाग करताना अडीचशेहून अधिक धावा केल्या. आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना अडीचशेहून अधिक धावा करणारा बेंगळुरू संघ पहिलाच संघ ठरला होता. हैदराबादने बेंगळुरूसमोर २८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगळुरू संघाने ७ बाद २६१ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात एकूण विक्रमी ५४९ धावा झाल्या होत्या. त्यानंतर पंजाब किंग्ज संघाने कोलकाता संघाविरुद्ध लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना २६२ धावा केल्या.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्हीं सघांनी २०० धावांचा पल्ला ओलांडला. दिल्ल कॅपिटल्सने २५७ धावा केल्या, तर मुंबई इंडियन्सला २४७ धावा करता आल्या. त्यानंतर रविवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनेही २०० धावांचा टप्पा गाठल्याचे पाहायला मिळाले. गुजरातच्या संघाने आरसीबीविरुद्ध ३ बाद २०० अशी धावसंख्या उभारली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-28T12:05:25Z dg43tfdfdgfd