IPL POINTS TABLE: 100+ धावांनी सामना जिंकल्याने KKR ला मोठा फायदा; दिल्ली रसा'तळाला'

IPL 2024 Points Table After KKR vs DC: इंडियन प्रिमिअर लिगच्या 16 व्या सामन्यामध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने दिल्ली कॅपीटल्सच्या संघावर मोठा विजय मिळवला. दमादर फलंदाजीच्या जोरावर कोलकात्याने तब्बल 272 धावांचा डोंगर उभा केला. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची दमछाक झाली. दिल्लीचे फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादात बाद होत गेल्याने त्यांना पूर्ण 20 षटकं मैदानावर टिकूनही राहता आलं नाही. 17.2 ओव्हरमध्ये दिल्लीचा संघ 166 धावांवर तंबूत परतला. विशाखापट्टणमममधील मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकात्याने अष्टपैलू कामगिरी करत सहज विजय मिळवला. या विजयाबरोबरच कोलकात्याने पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर 100 हून अधिक धावांनी पराभव झाल्याने दिल्लीचा संघ 10 पैकी 9 व्या स्थानावर फेकला गेला आहे. 

टॉप पाचमध्ये कोणते संघ?

पॉइण्ट्स टेबलमध्ये दिल्लीला पराभूत करुन कोलकात्याचा संघ पहिल्या स्थानी पोहोचला आहे. आयपीएलमधील आपले पहिले तिन्ही सामने कोलकात्याने जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. 6 पॉइण्ट्स आणि तब्बल 106 धावांनी मोठा विजय मिळवल्याने वाढलेल्या नेट रनरेटमुळे केकेआर +2.518 च्या नेट रन रेटसहीत पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा संघ असून त्यांनीही आपले तिन्ही सामने जिंकले आहेत. तिसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्जचा संघ असून त्यांना 3 पैकी 2 सामने जिंकला आले आहेत. याचप्रमाणे लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सच्या संघालाही प्रत्येकी 2 सामने जिंकता आले आहेत. प्रत्येकी 4 गुणांसहीत चेन्नई तिसऱ्या, लखनऊ चौथ्या आणि गुजरातचा संघ पाचव्या स्थानी आहे. 

नक्की पाहा >> Ball Of IPL पाहिला का? यॉर्करने फलंदाज कोसळला; जाताना बॉलरसाठी वाजवल्या टाळ्या

तळाशी कोणते संघ?

सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज इलेव्हन, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपीटल्सच्या संघाला प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. यापैकी आरसीबी आणि दिल्लीच्या संघाचे प्रत्येकी 4 सामने खेळले असून त्यातले 3 सामने गमावले आहेत. त्यामुळेच आरसीबी आठव्या आणि दिल्ली नवव्या स्थानी आहे. हैदराबादचा संघ सहव्या आणि पंजाबचा संघ सातव्या स्थानी आहे. त्यांचे प्रत्येकी 2 गुण आहेत. मुंबईचा संघ आपले पहिले तिन्ही सामने पराभूत झाला असून उणे 1.423 नेट रनरेटसहीत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील हा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे. 

नक्की पाहा >> Video: पंतने मारलेला No Look Six पाहून शाहरुख खानही खुर्चीवरुन उभा राहिला अन्...

मुंबईचा पुढील सामना कधी?

मुंबईचा पुढचा सामना वानखेडेवरच होणार आहे. 7 एप्रिल रोजी होणाऱ्या या सामन्यात मुंबईचा संघ दिल्लीच्या संघाविरुद्ध मैदानात उतरणार असून चौथ्या सामन्यात तरी मुंबईला विजय मिळतो का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

2024-04-04T04:12:39Z dg43tfdfdgfd