TEAM INDIA : महत्त्वाच्या फेरीतील लढतींमध्ये एकाच दिवसाची विश्रांती असल्याने टीम इंडिया नाराज; रोहित शर्माची टीका आणि कोपरखळी

ब्रिजटाऊन (बार्बाडोस) (विनायक राणे): फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यापाठोपाठ टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी टी-२० वर्ल्ड कपच्या सुपर आठ फेरीच्या कार्यक्रमावर टीका केली. हा कार्यक्रम ‘थोडाफार थकविणारा’ आहे, असे सांगत त्याने माझे सहकारी ‘विशेष’ कामगिरी करण्यासाठी ‘खऱ्या अर्थाने उत्सुक’ आहेत, असे खास अधोरेखित केले.

‘सुपर आठ’ फेरीत २० जूनला भारताची लढत अफगाणिस्तानविरुद्ध असून २२ जूनला भारत-बांगलादेश सामना रंगणार आहे. २४ जून रोजी भारतापुढे ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.

‘सुपर आठमधील पहिली लढत झाल्यानंतर पुढील दोन सामने आम्ही तीन, चार दिवसांमध्ये खेळणार आहोत,’ असे मत रोहितने बीसीसीआयच्या व्हिडीओमध्ये व्यक्त केले आहे. ‘हे थोडे दमछाक करणारे असले तरी आम्हाला या सगळ्याची सवय झाली आहे. तसेही स्पर्धा, सराव यासाठी आम्ही सतत प्रवास करतच असतो, त्यामुळे असे व्यग्र कार्यक्रम आमच्यासाठी सबब ठरणार नाहीत,’ असे ३७ वर्षीय रोहित म्हणाला.

‘संघातील प्रत्येकामध्ये काही तरी खास करून दाखविण्याचा हुरूप आहे. स्पर्धेतील दुसऱ्या फेरीचा श्रीगणेशा करण्यासाठी हा उत्साह महत्त्वाचा ठरणार आहे. माझा प्रत्येक सहकारी ठसा उमटविण्यासाठी प्रत्येक सत्रात झोकून देत मेहनत करत आहे,’ असे रोहित म्हणाला.

फारशी पूर्वकल्पना नसलेल्या अमेरिकेतील ड्रॉप-इन खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांना संघर्ष करावा लागला; पण आता विंडीजमधील परिचित खेळपट्ट्यांचा फायदा घेत कामगिरी करण्यासाठी टीम इंडिया आतूर आहे. ‘आम्ही इथे बरेच सामने बघितले असून खूप लढती खेळलोही आहोत. त्यामुळे यश मिळविण्यासाठी काय करायला हवे हे आम्ही जाणतो,’ असे रोहितने सांगितले. भारताने प्राथमिक गट लढतींत आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेस नमविले. तर कॅनडाविरुद्धची अखेरची साखळी लढत पावसामुळे वाया गेली.

सरावाचे तास वाढले

सोमवारी भारतीय संघाने नेहमीपेक्षा जास्त वेळ सराव केला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या सीनियर खेळाडूंनीही फलंदाजीच्या सरावाचे तास वाढविले होते. भारताची कॅनडाविरुद्धची प्राथमिक गट लढत वाया गेली. त्यामुळे सध्या भारताला मोठी विश्रांती आहे अन् मग लागोपाठ सामन्यांना सामोरे जायचे आहे. यामुळे फलंदाजी प्रशिक्षक राठोड यांनीही विंडीजमध्ये दाखल झाल्यानंतर फलंदाजीच्या सरावाचे तास वाढवावे लागतील, असे संकेत दिले होतेच.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-18T20:12:20Z dg43tfdfdgfd