TEAM INDIA: ४१ वर्षांपूर्वी टीम इंडियाने केली होती ऐतिहासिक कामगिरी; वेस्ट इंडिजला लोळवून केला मोठा पराक्रम

मुंबई: ४१ वर्षापूर्वी भारताणें अशक्य गोष्ट कशी शक्य करू शकतो हे करून दाखवले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करून १९८३ मध्ये पहिला वर्ल्डकप जिंकला. यापूर्वी १९७५ आणि १९७९मध्येही वर्ल्डकप खेळला गेला होता परंतु या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताने केवळ एकच सामना जिंकला. तर वेस्ट इंडिज पहिल्या दोन वर्ल्डकप स्पर्धेत चॅम्पियन ठरला आणि तिसराही वर्ल्डकप जिंकण्याचा प्रबळ दावेदार असताना भारताने सर्वांना चकित करत ही स्पर्धा जिंकली. या वर्ल्डकपनंतर भारतातील क्रिकेटचे चित्र पालटले. वर्ल्डकपमधील प्रवासाबद्दल एकंदरीतच जाणून घेऊया.

वेस्ट इंडिजला लोळवले

भारताने पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने यशपाल शर्मा यांच्या ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर २६२ धावसंख्या उभारली तर तेव्हा एकदिवसीय सामने ६० षटकांचे होते. रॉजर बिन्नी आणि रवी शास्त्री यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेत भारताला ३४ धावांनी विजय मिळवून दिला.

झिम्बाब्वेवर दमदार विजय

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने १५५ धावा केल्या. गोलंदाजीत भारताकडून मदन लाल यांनी तीन विकेट घेतल्या तर भारताने ५ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यात संदीप पाटील यांनी अर्धशतकी खेळी खेळली.

लागोपाठ दोन सामन्यांत पराभव

यानंतर भारताने सलग दोन सामने गमावले. ऑस्ट्रेलियाने १६२ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ट्रेव्हर चॅपलने ११० धावा केल्या होत्या आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विव्ह रिचर्ड्सने ११९ धावा केल्या होत्या.

कपिल देव यांची दमदार खेळी

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने १७ धावांत ५ विकेट गमावल्या. यानंतर कपिल देव यांनी १७५ धावांची ऐतिहासिक खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय फलंदाजाचे हे पहिले शतक होते तर या शतकाच्या जोरावर भारताला २६६ धावांपर्यंत मजल मारली. झिम्बाब्वेचा डाव केवळ २३५ धावांपर्यंतच मर्यादित राहिला.

ऑस्ट्रेलियाकडून बदला घेतला

शेवटच्या गट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना भारताने २४७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची भक्कम फलंदाजी अवघ्या १२९ धावांवर आटोपली. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी २९ धावांत ४ बळी घेतले.

सेमी फायनल फेरीत विजय मिळवला

सेमी फायनल फेरीत भारतासमोर यजमान इंग्लंडचे आव्हान होते. इंग्लड संघ २१३ धावांवरच आटोपला तर इंग्लंडच्या एका ही फलंदाजाला ४० पर्यंत पोहोचता आले नाही. कपिल देव यांनी ३ तर रॉजर बिन्नी आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. संदीप पाटील यांनी ५१ धावांची झंझावाती खेळी खेळत भारताला विजयापर्यंत पोहोचवले तर यशपाल शर्मा यांनी ६१ धावांची तर मोहिंदर अमरनाथ यांनी ४६ धावांची खेळी केली.

अंतिम फेरीत टीम इंडियाचा दबदबा

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने १८३ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना श्रीकांत यांनी ३८ धावांची खेळी खेळली. वेस्ट इंडिजकडून सर अँडी रॉबर्ट्सने ३ विकेट्स तर माल्कम मार्शल आणि मायकेल होल्डिंग यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. कॅरेबियन संघाला १४० धावांवरच सर्व बाद करत टीम इंडियाने हा सामना ४३ धावांनी जिंकून पहिला वर्ल्डकप जिंकवण्याचा मान २५ जून १९८३ला पटकावला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-25T05:55:42Z dg43tfdfdgfd