VIRAT KOHLI: अंतिम फेरीत साकारणार ‘विराटखेळी’; रोहित, द्रविडकडून किंग कोहलीची पुन्हा पाठराखण

जॉर्जटाऊन (गयाना) : अनुभवी, शैलीदार फलंदाज विराट कोहली टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत मोठी खेळी करेल, असे सांगत भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराटची पुन्हा पाठराखण केली आहे.

‘मला मनापासून असे वाटते की अंतिम फेरीत विराट नक्कीच छाप पाडेल. त्याची शैली, त्याचे सर्वस्व पणाला लावून खेळणे मला खूप आवडते’, विराटच्या गुणांकडे लक्ष वेधत द्रविड मुद्दा मांडतात. आयपीएलमध्ये ७४१ धावा कुटणाऱ्या विराटला वर्ल्ड कपच्या सात डावांत फक्त ७५ धावा करता आल्या आहेत.

‘विराट थोडीफार जोखीम पत्करत फलंदाजी करू लागला की काही वेळेस त्याला यश मिळत नाही हे तुम्हीही बघितले असेलच. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराटने सणसणीत षटकार लगावत सुरुवात केली होती, पण नशीब त्याच्याबाजूने नव्हते. त्या चेंडूलाही बऱ्यापैकी ‘मूव्हमेंट’ होती. मला स्वतःला त्याची फलंदाजी खूप भावते’, असा विश्वास व्यक्त करत द्रविड विराटच्या पाठीशी खंबीर उभे राहतात.

अशीच पाठराखण रोहित शर्मानेही केली. ‘विराट दर्जेदार खेळाडू आहे... अन् कुठल्याही खेळाडूला अशा प्रतिकूल दिवसांचा सामना करावाच लागतो. आपण सगळेच विराटचे कौशल्य आणि गुण जाणतो. त्याच्यासारखा खेळाडूची उपस्थिती मोठ्या सामन्यांमध्ये किती महत्त्वाची ठरते हेदेखील आपल्याला ठाऊक आहे. भारतीय संघासाठी गेली पंधरा वर्षे सातत्याने योगदान दिल्यानंतर ‘सूर हरवणे’, ही समस्याच ठरू शकत नाही’, आपल्या सीनियर सहकाऱ्याविषयी रोहित भरभरून बोलतो.

‘मी विराटला सरावात बघतो, त्याची सुरुवातही चांगली असते... त्याची लय कायम असून तो धावांचा भूकेला आहे हे आपण सगळेच जाणतो. मला असे वाटते की त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी अंतिम फेरीसाठी राखून ठेवली आहे’, रोहित विराटची बाजू लावून धरतो.

गेल्या बारा महिन्यांत आयसीसीच्या तीन स्पर्धांच्या (वनडे वर्ल्ड कप, कसोटी अजिंक्यपद, टी-२० वर्ल्ड कप) फायनलमध्ये धडक मारणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला.

अंतिम फेरीसाठी रोहितचे ध्येय

-संघाने मिळून ४० षटके सर्वोत्तम कामगिरी करणे

-संघहितासाठी मिळून योग्य निर्णय घेत सामन्यावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करायचा

-संघाला सूर, लय गवसली असून सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहोत. हेच फायनलमध्येही कायम ठेवायचे

‘माझ्यासाठी नव्हे; संघासाठी जिंका’

प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा करार आज, शनिवारी रंगणाऱ्या फायनलनंतर संपुष्टात येणार आहे. गेल्यावर्षी वनडे वर्ल्ड कपनंतरच द्रविड यांचा करार संपुष्टात आला होता. मात्र त्यांना थांबण्याची विनंती करत हा करार टी-२० वर्ल्ड कपपर्यंत वाढविण्यात आला. या पार्श्वभूमीवर ‘डूइटफॉरद्रविड’ असा हॅशटॅग चालविण्यात येतो आहे. ज्याला बराच पाठिंबाही लाभतो आहे. ‘हा काही व्यक्तिगत गौरवाचा क्षण नव्हे. ते सांघिक यश ठरेल. भारत जगज्जेता ठरला तर ते संघाची मेहनत आणि रोहितच्या प्रेरणादायी नेतृत्वाचे यश असेल. मी तर कुणा एकासाठी जेतेपद पटकावण्याच्या विरोधातच आहे. मला याबद्दल चर्चाच करायची नाही’, असे म्हणत द्रविड मुद्दा त्यांच्यापुरता संपवितात.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-29T03:25:57Z dg43tfdfdgfd