दुनिया गोल अन् अफगाणी खेळाडूचा विषय खोल! तब्बल ४५ देशांना पाजलं पाणी, पाहा लांबलचक यादी

मायदेशात प्रतिकूल परिस्थिती असताना अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी क्रिकेटवरील मेहनत कायम ठेवली. त्याच मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आज जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. टी-२० वर्ल्डकपमध्ये त्यांनी कांगारुंचा २१ धावांनी फडशा पाडला. गेल्या वर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानला विजयाची संधी होती. पण मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलनं द्विशतक झळकावलं. त्याच्या झंझावातामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पण त्या पराभवाचा बदला अफगाणिस्ताननं आज घेतला.

गेल्या काही वर्षांमध्ये अफगाणिस्ताननं क्रिकेटमध्ये केलेली प्रगती नजरेत भरणारी आहे. आर्थिक परिस्थिती तोळामासा असलेल्या देशातले तरुण आंतरराष्ट्रीय पातळीवर दिग्गज संघांना पराभवाचे धक्के देत आहेत. कर्णधार रशिद खानच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या संघात अनेक गुणी खेळाडू आहेत. मोहम्मद नबी हा त्यातलाच एक. आज त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. कष्टाचं चीज झाल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर होती.

मोहम्मद नबीचा अफगाणी संघाच्या नेत्रदीपक कामगिरीत मोलाचा वाटा आहे. ४५ देशांच्या क्रिकेट संघांचा पराभव नबीनं केला आहे. त्याची सुरुवात डेन्मार्कपासून झाली. ऑस्ट्रेलिया ४५ वा संघ ठरला. डेन्मार्क ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास नबीनं अफगाणिस्तान संघासोबत केला आहे. लिंबूटिंबू संघ ते कोणत्याही बलाढ्य संघाला नमवण्याची क्षमता राखणारा गुणी खेळाडूंचा संघ असा मोठा प्रवास अफगाणिस्तान संघानं केला आहे. त्यात नबीनं त्याचा वाटा उचलला. गोलंदाजी, फलंदाजीत त्यानं अनेकदा योगदान आहे.

टी-२० वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी मोहम्मद नबी हा ४३ देशांचा पराभव करणारा खेळाडू होता. या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्ताननं न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच पराभूत केलं. त्यामुळे दोन देशांची भर पडून आकडा ४५ वर गेला. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाची शेवटची विकेट काढण्यात नबीची भूमिका महत्त्वाची होती. ओमरझाईच्या गोलंदाजीवर नबीनं सीमारेषेवर ऍडम झाम्पाचा झेल घेतला आणि कांगारुंचा संघ ऑल आऊट झाला. या सामन्यात नबीनं केवळ १ षटक टाकलं. त्यात त्यानं १ धाव देत सलीमीवर डेव्हिड वॉर्नरला बाद केलं.

नबीनं पराभूत केलेल्या संघांची यादी-

डेन्मार्क

बहारिन

मलेशिया

सौदी अरेबिया

कुवेत

कतार

इराण

थायलंड

जपान

बहामास

बोटस्वाना

जर्सी

फिजी

टांझानिया

इटली

अर्जंटिना

पापुआ न्यू गिनी

कायमन आयलँड्स

ओमाण

चीन

सिंगापूर

पाकिस्तान

त्रिनिदाद अँड टोबॅगो

अमेरिका

भूतान

मालदिव्स

बार्बाडोस

उगांडा

बर्म्युडा

आर्यलँड

स्कॉटलँड

नामिबिया

नेदरलँड्स

कॅनडा

केनिया

हाँगकाँग

यूएई

झिम्बाब्वे

वेस्ट इंडिज

नेपाळ

श्रीलंका

बांगलादेश

इंग्लंड

न्यूझीलंड

ऑस्ट्रेलिया

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-23T11:33:59Z dg43tfdfdgfd