मुंबई इंडियन्सने रचला विजयाचा पाया, केकेआरला घाम फोडत २०० च्या आतच ऑल आऊट केले

मुंबई : करो या मरो सामन्यात कशी कामगिरी असावी, याचा उत्तम वस्तुपाठ मुंबई इंडियन्सच्या संघाने गोलंदाजी करताना दाखववून दिली. मुंबईने सुरुवातीलाच केकेारला तीन हादरे दिले आणि त्यांच्या धावसंख्येला वेसण घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही मुंबईने अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. त्यामुळेच मुंबईच्या संघाला केकेआरला २०० धावाही करू दिल्या नाहीत आणि त्यांना १६९ धावांत ऑल आऊट केले. केकेआरच्या वेंकटेश अय्यरने यावेळी अर्धशतक झळकावत संघाला सावरले. वेंकटेशने यावेळी ७० धावांची खेळी साकारली.

मुंबईने टॉस जिंकला आणि हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकचा हा निर्णय किती योग्य आहे, हे मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज नुवान थुशाराने दाखवून दिले. नुवानने पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर केकेआरचा सलामीवीर फिल सॉल्टला बाद केले, सॉल्टला यावेळी फक्त पाच धावा करता आल्या. त्यानंतरच्या आपल्या षटकात नुवानने अंगक्रिश रघुवंशीला १३ धावांवर बाद केले. नुवान फक्त एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने याच षटकात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरलाही सहा धावांवर बाद केले. त्यामुळेच मुंबईने केकेआरची अवस्था ३ बाद २८ अशी केली होती.

केकेआटराल चौथा धक्का दिला तो मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने. हार्दिकने खेळपट्टीवर ठाण मांडून बसलेल्या सुनील नरिननला आठ धावांवर बाद केले. यावेळी सर्वांच्या नजरा या रिंकू सिंगवर लागलेल्या होत्या. पण रिंकूला यावेळी लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही. पीयुष चावलाने आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत रिंकूला माघारी धाडले, त्याला फक्त ९ धावाच करता आल्या. यावेळी केकेआरचा अर्धा संघ फक्त ५७ धावांवर तंबूत परतला होता.

मुंबईचा संघ आता केकेआरला झटपट गुंडाळेल, असे वाटत होते. पण त्यावेळी वेंकटेश अय्यर आणि मनीष पांडे धावून आले. वेंकटेश आणि मनीष या दोघांनी सहाव्या विकेटसाठी दमदार भागीदारी रचली आणि केकेआरच्या संघाला सारवल्याचे पाहायला मिळाले. कारण या दोघांनी संघाला शतकाची वेस ओलांडून दिली होती. वेंकटेशने यावेळी ३६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर मनीष पांडे ४२ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा केकेआरचा डाव गडगडल्याचे पाहायला मिळाले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-03T15:55:54Z dg43tfdfdgfd