शाहिद आफ्रिदीच्या सांगण्यावरुन रैनाने डिलीट केली 'ती' पोस्ट; आफ्रिदी म्हणाला, 'त्याची चूक...'

T20 World Cup 2024 Suresh Raina Deletes Social Media Post Shahid Afridi Connection: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाबरोबर चर्चा केल्याचा दावा केला आहे. रैनाने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर रैनाने पोस्ट डिलीट केल्याचं आफ्रिदीने म्हटलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...

रैनाने काय पोस्ट केलेलं?

पाकिस्तानचा माजी कर्णधार असलेल्या आफ्रिदीला टी-20 वर्ल्ड कप 2024 चा सदिच्छा दूत (ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर) म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर एका चाहत्याने रैनाने डिवचलं होतं. "आयसीसीने शाहिद आफ्रिदीला टी-20 वर्ल्ड कप 2024 चा सदिच्छा दूत घोषित केलं. हॅलो सुरेश रैना," अशी पोस्ट या पाकिस्तानी चाहत्याने केली होती. यावर रैनाने तातडीने रिप्लाय देत पाकिस्तानी चाहत्याला सणसणीत टोला लगावला होता. "मी आयसीसीचा ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर नाही, पण माझ्याकडे माझ्या घरी 2011 च्या वर्ल्ड कप आहे. तुला मोहालीमधला सामना आठवतोय का? अपेक्षा आहे की यामधून तुला काही न विसरता येणाऱ्या आठवणींना उजाळा देता येईल," असं रैनाने म्हटलं होतं.

आफ्रिदीचं रैनाबरोबर काय बोलणं झालं?

रैनाने केलेल्या या पोस्टसंदर्भात त्याच्याबरोबर चर्चा केल्याचा दावा आफ्रिदीने केला आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओत आफ्रिदीने हा दावा केला आहे. आम्हा दोघांमध्येही सारं काही अगदी व्यवस्थित असून कोणताही वाद नाहीये, असं आफ्रिदी रैनाबद्दल सांगताना म्हणाला. "सुरेश रैना आणि मी क्रिकेटच्या मैदानावर अनेक क्षण एकत्र अनुभवले आहेत. तो फार छान व्यक्ती आहे," असं आफ्रिदी व्हिडीओत म्हणाला. तसेच, "कधीतरी शब्दांची हलकीफुलकी देवणाघेवाण होते. सोशल मीडियावर त्याची पोस्ट पाहिल्यानंतर मी त्याच्याशी बोललो. त्याने लहान भावाप्रमाणे परिस्थिती समजून घेतली. त्याने ती पोस्ट डिलीट करण्यास होकार दिला. आमच्यात सारं काही ठीक आहे. अशा गोष्टी घडत राहतात. चांगली व्यक्ती त्याची चूक मान्य करते आणि सुधारते," असं आफ्रिदी म्हणाला. 

नक्की वाचा >> '..किंवा ज्या देशाला पाठिंबा देता तिथं जाऊन राहा', All Eyes On Rafah वरुन 'गुजराती' क्रिकेटरचा टोला

आयपीएलमध्येच रैनाने उडवलेली आफ्रिदीची खिल्ली

दरम्यान, आयपीएल सुरु असतानाही एका सामन्यामध्ये कॉमेंट्री करताना रैनाने आफ्रिदीवर खोचक टीका केली होती. आकाश चोप्राने कॉमेंट्रीदरम्यान रैनाला निवृत्ती मागे घेऊन पुन्हा मैदानात उतरण्याचा तुझा काही विचार आहे का असं रैनाला विचारलं होतं. यावर रैनाने, "मी सुरेश रैना आहे शाहिद आफ्रिदी नाही," असं उत्तर दिलेलं. यानंतर दोघेही कॉमेंट्री बॉक्समध्ये जोरजोरात अगदी टाळ्या देत हसू लागले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 

शाहिदबरोबर युवराजही सदिच्छा दूत

यंदा शाहिद आफ्रिदीबरोबरच भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह, युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल आणि जगातील सर्वात वेगवान व्यक्ती असलेल्या उसेन बोल्टचाही सदिच्छा दूतांच्या यादीत समावेश आहे. 2007 मध्ये पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघाला फायनलपर्यंत पोहचवण्यात शाहिद आफ्रिदीने मोलाचं योगदान दिलं होतं. त्यानंतर 2009 मध्ये पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा आफ्रिदी संघात होता. 

2024-05-31T06:28:43Z dg43tfdfdgfd