IND VS BAN : भारताने टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा विचारही करू नये, रवी शास्त्री असं का म्हणाले जाणून घ्या कारण

अँटीग्वा : भारतीय संघ टी-२० वर्ल्ड कपमध्ये अपराजित आहे. भारताने एकही सामना गमावलेला नाही. पण तरीही भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा विचार करू नये, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.

रवी शास्त्री हे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहीलेले आहेत. त्यामुळे रवी यांना भारतीय संघाबाबत बरीच माहिती आहे. भारताने वनडे वर्ल्ड कपमध्येही सर्व सामने जिंकले होते आणि ते अंतिम फेरीत दाखल झाले होते. पण वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या वर्ल्ड कपमध्येही भारताचा संघ जबरदस्त फॉर्मात आहे. पण तरीही भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा विचार का करू नये, हे रवी शास्त्री यांनी सांगितले आहे.

रवी शास्त्री म्हणाले की, " माझ्यामते भारतीय संघाने बिनधास्त खेळ करावा. भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. जसप्रीत बुमराह हा भन्नाट फॉर्मात आहे. एका सामन्यात चार षटकांमध्ये त्याने फक्त सातच धावा दिल्या होत्या, अशी गोष्ट टी-२० क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही. भारतीय संघ सर्व गोष्टींमध्ये चांगली कामगिरी करत आहे. पण तरीही त्यांनी टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा विचार करू नये. भारतीय संघाने वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचा विचारही करू नये, असे मला वाटते. माझ्यामते भारतीय संघाने एका वेळी एकाच सामन्याचा विचार करावा. प्रत्येक सामन्यागणित त्यंनी विचार करावा. जर भारतीय संघ टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली, तर जे काही होईल ते त्यांनी स्विकारायला हवे. पण त्यांना एकावेळी एकाच सामन्याचा विचार करायला हवा."

जर भारतीय संघाने आत्ताच फायनलचा विचार केला तर त्यांचे सध्याच्या सामन्यावरील लक्ष उडून जाऊ शकते किंवा त्यावर त्यांना जास्त लक्ष केंद्रीत करता येणार नाही. त्यामुळे जर एका वेळेला त्यांनी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रीत केले तर त्यांना तो सामना जिंकता येऊ शकतो. भारताने एकामागून एक सामने जिंकले तर ते थेट अंतिम फेरीत पोहोचू शकतात, असे रवी शास्त्री यांना यावेळी सुचवायचे आहे.

रवी शास्त्री हे भारतीय संघाचे संचालक आणि प्रशिक्षक होते. त्यावेळी विराट कोहली हा भारताचा कर्णधार होता. पण शास्त्री यांच्या कार्यकाळात भारताला एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नव्हती आणि हीच खंत त्यांनाही असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-22T13:45:21Z dg43tfdfdgfd