SACHIN TENDULKAR: सचिन तेंडुलकर वर्ल्डकप जिंकण्याआधीच घेणार होते निवृत्ती, एका कॉलमुळे रद्द केला निर्णय

मुंबई: क्रिकेट म्हटल की पहिले आठवते ते सचिन तेंडुलकर यांचे नाव. सचिन यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० शतके ठोकली आहेत. सचिन यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत तसेच त्यांनी जवळ जवळ २४ वर्ष क्रिकेट खेळले आहे तर आपल्या कारकिर्दीत त्यांनी वनडेमध्ये १८,४२६ आणि कसोटीत १५,९२१ धावा केल्या आहेत परंतु, इतके यशस्वी करिअर असून सुद्धा ते त्यांच्या करिअरमध्ये फार आधीच निवृत्ती घेणार होते. सचिन हे निवृत्ती घेणार होते तितक्यातच त्यांना एका व्यक्तीने रोखले आणि तेंडुलकर यांनी निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला.

म्हणून निवृत्तीचा विचार आला होता

२००७च्या वर्ल्डकप वेळी भारतीय क्रिकेट संघात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग आणि राहुल द्रविड यांसारख्या महान फलंदाजांचा समावेश होता, परंतु टीम इंडिया बांगलादेश आणि श्रीलंकेकडून पराभूत झाल्याने पहिल्याच फेरीतूनच बाहेर पडली. यानंतर टीम इंडिया जेव्हा भारतात परतली, तेव्हा चाहत्यांनी या खेळाडूंचे पुतळे जाळण्यास सुरुवात केली आणि त्यामुळेच सचिन तेंडुलकर यांनी निवृत्तीचा मोठा निर्णय घेण्याचे ठरविले.

या व्यक्तीच्या एका कॉलमुळे नाही घेतली निवृत्ती

एकदिवसीय वर्ल्डकप २००७च्या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवामुळे सचिन तेंडुलकर यांनी निवृत्तीचा निर्णय घेणार होते, तर त्यांनी निवृत्ती का घेतली नाही याचे कारण सांगितले आहे, "त्यावेळी मी ३४ वर्षांचा होतो पण केवळ एक व्यक्तीमुळे मी हा निर्णय रद्द केला आणि निवृत्ती नाही घेतली आणि ती व्यक्ती म्हणजे व्हिव रिचर्ड्स होते, त्यांनी मला निवृत्ती घेण्यापासून रोकले आणि समजावले की, तू अजून खूप क्रिकेट खेळू शकतो त्यामुळे निवृत्तीचा तर विचार सुद्धा करू नकोस, आम्ही जवळजवळ ४५ मिनिटे फोनवर बोललो".

सचिन तेंडुलकर यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, “मी मोठा होत असताना व्हिव माझा हिरो होता आणि कायम राहील, तो माझ्याशी लहान भावासारखा वागतो त्यामुळे जेव्हा त्याने मला फोन करुन खेळत राहण्यास सांगितले, त्याचे हे शब्द माझ्यासाठी खूप मोलाचे ठरले, यानंतर मी खेळत राहिलो आणि २००८ मध्ये सिडनीमध्ये शतक झळकावून फॉर्ममध्ये परतलो.”

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-04T08:07:35Z dg43tfdfdgfd