VIRAT KOHLI:विराट कोहली अमेरिकेला असून सुद्धा का खेळला नाही सराव सामान ? रोहित शर्माने सांगितले कारण, म्हणाला ...

मुंबई: टी-२० वर्ल्डकपला आता सुरुवात झाली असून पहिली लढत अमेरिका आणि कॅनडा यांच्यात रंगली. या लढतीत अमेरिकेला यश मिळाले तर तब्बल ६० धावांनी कॅनडाने हा सामना गमावला. भारत आणि बांगलादेश यांच्यातसुद्धा १ जूनला सराव सामना रंगला तर भारताने या सामन्यात विजय पटकावला.

भारताची पहिली तुकडी जेव्हा अमेरिकेच्या दिशेने रवाना झाली होती तेव्हा त्या तुकडीसोबत विराट नव्हता तेव्हापासून विराटबद्दल खूप चर्चा रंगल्या आहे, तर विराट भारतीय संघासोबत सराव सत्रात सुद्धा दिसला नाही. न्यूयॉर्कला जाण्यासाठीचे पेपर वर्क पूर्ण न झाल्याने तो भारतीय तुकडीसोबत पुढे गेला नाही असे कारण नंतर समोर आले, तर आता मात्र विराट अमेरिकेला पोहोचला असून सुद्धा तो सराव सामना खेळताना दिसला नाही त्यामुळे विराट पोहोचला आहे की नाही यावरून खूप चर्चा रंगल्या आहे. तर बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यावेळी कर्णधार रोहित शर्माने विराट का खेळला नाही यामागचे कारण सांगितले.

रोहित विराटबद्दल म्हणाला...

रोहितने सांगितले,"विराट कोहली कालच आला आहे त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यस्थापकांनी दिला आहे, तो या सामन्यात खेळणार नाही पण बाकी सर्व खेळाडू सज्ज आहेत. आयरलँड विरुद्धच्या सामन्यात तो नक्कीच दिसेल".

भारतीय संघाची जोरदार कामगिरी

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी मैदानांत उतरल्यानंतर टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मासोबत सलामीला आलेला संजू सॅमसन सहा चेंडूत केवळ एक धावा काढून बाद झाला. टीम इंडियाला पहिला झटका ११ धावांवर बसला. मात्र, यानंतर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी झाली. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. शिवम दुबेला मात्र विशेष कामगिरी करता आली नाही त्याने केवळ १६ चेंडूत १४ धावा केल्या. मात्र, टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन २३ चेंडूत ४० धावा केल्या. त्याने आपल्या स्फोटक खेळीत चार षटकार आणि दोन चौकार लगावले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-02T12:15:42Z dg43tfdfdgfd