अफगाणिस्ताननं इतिहास रचला, कांगारुंना धक्का; पडद्यामागे राबलेले दोघे ठरले विजयाचे अनसंग हिरो

मुंबई: गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानवर थरारक विजय साकारला. हातातोंडाशी असलेला सामना अफगाणिस्ताननं गमावला. त्या पराभवाची परतफेड अफगाणिस्ताननं टी-२० विश्वचषक स्पर्धेत २१ धावांनी नमवून केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं १४८ धावा केल्या. अफगाणी गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला १२७ धावांत गुंडाळलं आणि धक्कादायक निकालाची नोंद केली.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकप मोहीम धोक्यात आली आहे. कांगारुंचा पुढील सामना २६ जूनला भारताशी होईल. भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यास आणि अफगाणिस्ताननं बांगलादेशचा धुव्वा उडवल्यास ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल, तर अफगाणिस्तान उपांत्य फेरी गाठेल. अफगाणिस्तानच्या यशात मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट आणि वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोचा मोलाचा वाटा आहे. ब्रावो अफगाणी संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.

इंग्लंडचा माजी खेळाडू जोनाथन ट्रॉटनं जुलै २०२२ मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्याचा कार्यकाळ १८ महिन्यांचा होता. तो २०२३ मध्ये संपला होता. पण त्याच्या कार्यकाळात संघाची कामगिरी चांगली झाल्यानं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं त्याच्यासोबतच्या कराराला मुदतवाढ दिली. ट्रॉटच्या मार्गदर्शनाखाली संघानं बलाढ्य संघानं कडवी झुंज देत धक्कादायक निकालांची नोंद केली.

विंडीजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोची नियुक्ती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी केली. गोलंदाजी सल्लागार म्हणून तो रुजू झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याची भूमिका मोलाची होती. धावांचं फारसं पाठबळ नसताना अफगाणी गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. ठराविक अंतरानं विकेट्स काढल्या. त्यावेळी ब्रावोच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. त्याची भावनिक गुंतवणूक चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत होती. संघाला त्यानं केलेलं मार्गदर्शन मोलाचं ठरलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय अफगाणिस्तानसाठी अनेकार्थांनी महत्त्वाचा आहे. अफगाणिस्ताननं टी-२० वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. कांगारुंचा संघ ६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्यांदाच अफगाणिस्तानविरुद्ध पराभूत झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं काही महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार दिला होता. कारण अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला खेळण्याचा अधिकार नाही. पण आता त्याच ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानला धक्का दिला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-23T07:03:13Z dg43tfdfdgfd