चुकीला माफी नाही...! अंपायरशी भिडणाऱ्या MATTHEW WADE ला आयसीसीने दाखवला इंगा

T20 World Cup 2024 : गेल्या शनिवारी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना (Eng vs Aus) इंग्लंडशी झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने 36 धावांनी विजय मिळवला अन् इंग्लंडचा लाजीरवाणा पराभव केला. मात्र सामन्यादरम्यान मॅथ्यू वेडने (Matthew Wade) मैदानावरील पंचांशी वाद घातल्याने क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आलं होतं. मॅथ्यू वेडने आक्रमक अंदाजात पंचांशी वाद घातल्याचं दिसून आलं होतं. त्यावरून आता आयसीसीने मॅथ्यू वेडला वॉर्निंग दिली अन् एक डिमेरिट पॉइंट दिला (ICC Code of Conduct) आहे. या प्रकरणात आयसीसीने नेमकं काय म्हटलं? जाणून घ्या

नेमकं काय झालं?

ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू असताना ही घटना घडली. ऑस्ट्रेलियाच्या 18 व्या ओव्हरमध्ये जेव्हा लेगस्पिन गोलंदाज आदिल रशीद गोलंदाजीला आला तेव्हा मॅथ्यू वेड फलंदाजी करत होता. या ओव्हरचा तिसरा बॉल वादग्रस्त ठरला.  वेड मोठा शॉट खेळणार होता, पण चेंडू अशा प्रकारे आला की वेडला बचावासाठी बॅट पुढे आणावी लागली. हा बॉल डेड बॉल घोषित करावा, अशी वेडची मागणी होती. मात्र, पंच नितीन मेमन यांनी बॉल योग्य असल्याचं घोषित केलं, त्यावरून मॅथ्यू वेड संतापला अन् त्याने लाईव्ह सामन्यात वाद घातला होता.

आयसीसीने काय म्हटलं?

मॅथ्यू वेडने आदिल रशीदकडून गोलंदाजाचा एक चेंडू खेळला पण त्याला पंचांकडून 'डेड बॉल' म्हणण्याची अपेक्षा होती. फलंदाजाने खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचाऱ्यांसाठीच्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.8 चे उल्लंघन केल्याचे आढळून आलं आहे. जे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अंपायरच्या निर्णयावर असहमत दर्शविण्याशी संबंधित आहे, असं आयसीसीने म्हटलं आहे. तसेच मॅथ्यू वेडच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे, असं आयसीसीने सांगितलं आहे. 

दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 7 गडी गमावून 201 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लिश संघाला 20 षटकांत 6 बाद 165 धावाच करता आल्या. या विश्वचषकात २०० धावांचा टप्पा गाठणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे.  तब्बल 17 वर्षांनंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाने हा विजय मिळवला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने 2007 च्या केपटाऊनमध्ये झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकात इंग्लंडचा पराभव केला होता.

2024-06-10T15:08:18Z dg43tfdfdgfd