BABAR AZAM.: ... म्हणून, आम्ही सामना गमावला बाबर आझमने पराभवानंतरही दिले स्पष्टीकरण

मुंबई: टी-२० वर्ल्डकप मधील अ गटातील सामना भारत-पाकिस्तान संघात रंगला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत-पाक पुन्हा एकदा आमने सामने आले आणि नेहमीप्रमाणे भारतने पाकिस्तानसमोर विजयी घौडदौड सुरूच ठेवली. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तान संघावर गोलंदाजीने आक्रमण करत पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवला आणि सामना जिंकवला. सामना संपल्यानंतर पाकिस्तान कर्णधाराने सामना कसा हातातून निसटला यावर मत मांडले.

टी-२० वर्ल्डकप मधील १९ वी लढत भारत-पाक यांच्यात रंगली असून भारताने नेहमीप्रमाणे पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला. या वर्ल्डकप मध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय आहे तर पाकिस्तान संघाचा सलग दुसरा पराभव. पाकिस्तानला या पराभवामुळे सुपर ८ मध्ये पोहोचणे अवघड होणार असल्याचे दिसत आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सामना कसा हातातून सुटला याचे स्पष्टीकरण दिले.

बाबर आझम पराभवावर म्हणाला..

पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम म्हणाला, " आम्ही गोलंदाजी खूप चांगली केली फक्त फलंदाजी नीट करता आली नाही, सलग दोन विकेट्स गमावल्या आणि भरपूर डॉट बॉल खेळले. अगदी सामान्यपणे खेळण्याची रणनीती होती उगाच ओढून ताणून आम्ही खेळणार नव्हतो, फक्त स्ट्राइक रोटेट करत राहायची आणि मध्ये एखादा चौकार मारायचा असे ठरवले होते मात्र अनेक डॉट बॉल टाकण्यात आले".

"खालच्या फळीतील फलंदाजांकडून फार अपेक्षा ठेवता येत नाहीत, पहिल्या सहा षटकांत चांगली फलंदाजी करण्याचा आमचा प्रयत्न होता पण एक विकेट लवकर पडल्याने पहिल्या सहा षटकांत पुन्हा चांगली कामगिरी करता आली नाही, खेळपट्टी चांगली दिसत होती, चेंडू चांगल्या वेगाने येत होता काही चेंडू अगदी स्लो येत होते तर काही चेंडू जास्त उसळत होते, आता आम्हाला शेवटचे दोन सामने जिंकणे गरजेचे आहे, "बाबर आझम म्हणाला.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी गोलंदाजांनी भारताला चांगलेच धक्के एका पाठोपाठ दिले तरीही अशा स्थितीत १९ षटकांत ११९ धावा करून भारत ऑलआऊट झाला. मात्र, पाकिस्तानला १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही आणि निर्धारित २० षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात केवळ ११३ धावा करता आल्या, आणि पाकिस्तानने सहा धावांनी सामना गमावला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-10T04:15:04Z dg43tfdfdgfd