रोहित-कोहलीसाठी कर्दनकाळ ठरणार अफगाणिस्तानचा 'हा' गोलंदाज? 3 सामन्यात घेतल्यात 12 विकेट्स

IND vs AFG T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करतेय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्डकपच्या सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. आता टीम इंडियाला सुपर 8 मध्ये 3 देशांशी झुंज द्यावी लागणार आहे. सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तानसोबत असणार आहे. 

सुपर 8 मधील टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध खेळला जाणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये या टीमने त्यांच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. रशीद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानच्या टीम चांगली कामगिरी करतेय. यावेळी टीममध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे T20I मध्ये खेळ बदलू शकतात. यामधील एक खेळाडू म्हणजे फजलहक फारुकी. 

रोहित-कोहलीसाठी ठरू शकतो कर्दनकाळ

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघंही डावखुऱ्या गोलंदाजांना खेळताना अडचणीत येतात, याची जवळपास सर्वांना कल्पना आहे. ट्रेंट बोल्ट, शाहीन आफ्रिदी, मिचेल स्टार्क या गोलंदाजांनी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये भारतीय फलंदाजांना अडचणीत आणलं होतं. अफगाणिस्तानविरुद्ध आता रोहित आणि कोहलीच भारतीय डावाची सुरुवात करणार आहेत. अशा परिस्थितीत चांगल्या फॉर्मात असलेला फारुकी या दोघांसाठीही त्रासदायक ठरू शकतो.

वर्ल्डकपमध्ये कशी आहे फजलहक फारुकीची कामगिरी?

फजलहक फारुकी याने या टी-20 वर्ल्डकपमध्ये 3 सामने खेळले असून यामध्ये त्याने 3.50 च्या सरासरीने सर्वाधिक 12 विकेट घेतल्या आहेत. फारुकीने युगांडाविरुद्धच्या लीग स्टेजमधील सामन्यात केवळ 9 रन्स दिले होते. यावेळी त्याने 5 विकेट घेतल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्धची त्याची गोलंदाजीही अत्यंत भेदक होती. या सामन्यात फारुकीने 17 रन्समध्ये 4 फलंदाजांना माघारी धाडलं होतं. 

फारुकीचा उत्कृष्ट फॉर्म कायम राहिला असून त्याने पापुआ न्यू गिनीविरुद्ध 16 रन्समध्ये 3 विकेट्स घेतले होते. सध्या फारुकी हे अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानचा उजवा खेळाडू ठरतोय. बार्बाडोसमध्ये गोलंदाजांना सुरुवातीला स्विंग मिळेल, अशा परिस्थितीत तो खूप धोकादायक ठरू शकतो. 

2024-06-18T02:51:45Z dg43tfdfdgfd