भारताच्या प्रशिक्षकपदाबाबत गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात जिंकली सर्वांची मनं...

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा पुढचा प्रशिक्षक असेल, असे म्हटले जात आहे. पण भारताच्या प्रशिक्षकपदाबद्दल आता गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी गंभीरने एका वाक्यात सर्वांचीच मनं जिंकल्याचे पाहायला मिळाले आहे. गंभीरचा हा व्हिडिओ सध्याच्या घडीला जगभरात चांगलाच व्हायरल झाला आहे.

भारताच्या प्रशिक्षकपदाबद्दल गंभीर नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...

गौतम गंभीरची ही खास मुलाखत एका दुबईमध्ये झाली. यावेळी गंभीर म्हणाला की, " मला भारतीय संघाचे प्रशिक्षक व्हायला आवडेल. तुमच्या राष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. तुम्ही जगभरातील १४० कोटी भारतीयांचे आणि त्याहूनही अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करत आहात. जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करता तेव्हा त्यापेक्षा मोठे कसे होऊ शकते. भारताला विश्वचषक जिंकण्यास मदत करणारा मी एकटाच नाही, तर १४० कोटी भारतीय भारताला विश्वचषक जिंकण्यास मदत करतील. जर सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आणि आम्ही चांगले खेळलो तर भारत विश्वचषक जिंकेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निर्भय असणे, ही आहे असे मला वाटते. कोणत्याही गोष्टीचे भय तुमच्यामध्ये जेव्हा नसते तेव्हाच तुम्ही मोठी गोष्ट करू शकता."

गंभीर हा आयपीएलमध्ये केकेआरचा मार्गदर्शक होता. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने आयपीएल जिंकली. त्यानंतर गंभीरचं सर्वत्र कौतुक सुरु आहे. आयपीएल अखेरच्या टप्प्यात असताना बीसीसीआयने गंभीरला भारताच्या प्रशिक्षपदाबाबत विचारले होते. कारण या टी-२० वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्ड कपनंतर कोण भारताचा प्रशिक्षक होणार, याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत गंभीरला विचारणा केल्याचे म्हटले जात आहे.

गंभीरबरोबर केकेआरने १० वर्षांचा करार केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे गंभीर केकेआरची साथ सोडणार का, हे प्रथम पाहावे लागणार आहे. त्यामुळे गंभीर केकेआरच्या मार्गदर्शकपदी कायम राहतो की तो आता भारताचा प्रशिक्षक होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-02T16:46:25Z dg43tfdfdgfd