INDIA PREDICTED XI VS PAKISTAN: इच्छा असूनही पाकिस्तानविरुद्ध 'या' 2 दोघांना मैदानात उतरवता येणार नाही

Team India Predicted XI vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा संघ आज टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये न्यूयॉर्कमधील नासो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने येणार आहेत. स्पर्धेमधील अ गटातील हे दोन्ही संघ आपआपला दुसरा सामना आज खेळणार असून या सामन्यापूर्वीचा आयर्लंडविरुद्धचा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला असून दुसरीकडे पाकिस्तानला अनपेक्षितरित्या अमेरिकेसारख्या नवख्या संघाकडून सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी पराभव पत्कारावा लागला आहे. त्यातच या नव्या मैदानावरील खेळपट्टी सुरुवातीपासूनच वादाचा विषय ठरत असल्याने दोन्ही संघ नेमक्या कोणत्या कॉम्बिनेशनसहीत खेळणार याबद्दल संभ्रम आहे. इच्छा असूनही रोहितला दोन स्टार खेळाडूंना संघाबाहेर ठेवावं लागणार असल्याचं सध्या तरी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघातून कोणते 11 खेळाडू हा सामना खेळतील हे पाहूयात

खेळपट्टीवर सारा खेळ अवलंबून

नासो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळपट्टी सर्वांनाच गोंधळवून टाकणारी आहे. अगदी रोहित शर्माने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्येही क्युरेटरलाच खेळपट्टी कशी आहे हे ठाऊक नसल्याचा टोला लगावला आहे. असं असतानाच ही खेळपट्टी पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांना फायद्याची ठरु शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मैदानावरील सामने कमी धावसंख्येची होतील असा अंदाज आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असेल असा अंदाज आहे. त्यामुळे भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने अक्सर पटेलच्या माध्यमातून एक अतिरिक्त फलंदाज खेळवणं फायद्याचं ठरेल असं म्हटलं आहे. कुलदीपऐवजी अक्सरसारखा अष्टपैलू खेळाडू अधिक उत्तम ठरेल असं जाफरचं म्हणणं आहे. 

..म्हणून अष्टपैलू खेळाडू अधिक उत्तम

"आपण विचार केला होता की यशस्वी जयसवाल सलामीला येईल. मात्र ते कॉम्बिनेश योग्य ठरणार नाही. अक्सरने खेळावं असं मला वाटतं कारण त्याची फलंदाजी कामी येऊ शकतो. तुम्हाला कुलदीपने खेळावं असही वाटू शकतो. मात्र खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असल्याने कुलदीप फारसा प्रभावी ठरणार नाही. वेगवान गोलंदाज अधिक परिणामकारक ठरतील. खेळपट्टीवर रोलर फिरवत राहिल्यास ती फिरकीपटूंना साथ देऊ शकते. या मैदानावर संघांना 100 धावा करतानाही झगडावं लागलं आहे. मात्र भारत-पाकिस्तान सामन्यात फलंदाजीसाठी योग्य ठरणारी खेळपट्टी असेल अशी माझी अपेक्षा आहे. आपल्याला उत्तम क्रिकेट पाहायचं आहे. मात्र या मैदानावर वेगवान गोलंदाजांना अधिक विकेट्स घ्याव्या लागतील असं दिसतंय," अशी प्रतिक्रिया जाफरने 'स्टार स्पोर्स्टस'शी बोलताना सांगितलं. 

रोहित म्हणतो या खेळाडूलाही खेळवता येणार नाही

"आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यामध्ये पंतला खेळताना पाहिलं होतं. त्यानंतरच मी त्याला वरच्या क्रमांकावर खेळवण्याचं निश्चित केलं होतं. हे सारं गणित योग्य क्रमांकावर योग्य खेळाडू खेळवण्याचं आहे. त्याचा गोलंदाजांवर आक्रमण करण्याची, तुटून पडण्याची शैली आम्हाला फायद्याची ठरु शकते. त्यामुळेच आपण यशस्वीला खेळवू शकत नाही. सलामीवीर वगळता फलंदाजांचा कोणताही क्रम निश्चित करण्यात आलेला नाही. अगदीच सुपर ओव्हर झाली तर फेरफार होऊ शकतो. आम्हाला फ्लेक्झिबल राहायचं आहे," असं कर्णधार रोहित शर्माने सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> T20 World Cup Ind vs Pak: अमेरिकेतला हा सामना भारतात किती वाजता, कुठे LIVE दिसणार?

भारताचा संभाव्य संघ

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेट कीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

पाकिस्तानचा संभाव्य संघ

मोहम्मद रिझवान (विकेट कीपर), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद अमीर, नसीम शाह

2024-06-09T04:47:53Z dg43tfdfdgfd