ROHIT SHARMA T20 RETIREMENT: संपूर्ण देशाला आनंद दिल्यानंतर हिटमॅनने घेतला कठोर निर्णय; विराटच्या घोषणेनंतर अवघ्या ३० मिनिटात रोहित शर्माची टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती

बार्बाडोस: अखेरच्या षटकापर्यंत चुरशीच्या रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले. भारताचे हे दुसरे टी-२० आणि एकूण आयसीसीचे चौथे विजेतेपद ठरले. भारताच्या या ऐतिहासिक विजयाचे हिरो ठरले विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पटेल होय. या तिघांमध्ये सर्वाधिक चमकला तो टीम इंडियाचा रन मशीन विराट कोहली होय. अंतिम सामन्यात त्याने ५९ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. भारताच्या या विजयानंतर सामनावीर पुरस्कार घेताना विराटने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराटच्या या घोषणेनंतर फक्त ३० मिनिटात कर्णधार रोहित शर्माने देखील त्याचा निर्णय सांगून टाकला. भारताचा हिटमॅन आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पुन्हा खेळणार नाही.

भारताच्या या टी-२० वर्ल्डकप विजयासोबत दोन महान खेळाडूंच्या करिअरचा शेवट देखील गोड झाला. टी-२० क्रिकेटमधील सर्वात धोकादायक आणि आक्रमक खेळाडू अशी ओळख असलेल्या रोहितने देशाला वर्ल्डकप जिंकून दिल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने ही माझा टी-२० क्रिकेटमधील शेवटची मॅच होती असे जाहीर केले. हा फॉर्मेट खेळण्यास सुरुवात केल्यापासून मी याचा खुप आनंद घेतला. आता निरोप घेण्याची ही योग्य वेळ आहे. मी या खेळाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला, असे रोहितने सांगितले.

हेच मला हवे होते. मला वर्ल्डकप जिंकायचा होता, असे रोहितने म्हणताच सर्वांनी टाळ्यांनी त्याचे अभिनंदन केले. निवृत्तीची घोषणा करताना रोहितने संघाचे कोच राहुल द्रविड यांचे आभार मानले आणि कौतुक देखील केले. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी गेल्या २० ते २५ वर्षात खुप काही केले आहे. ही एकमेव गोष्ट शिल्लक होती. मी आणि संपूर्ण संघ खुप आनंदी आहोत की आम्ही त्यांच्यासाठी हे करू शकलो, असे रोहित म्हणाला.

रोहित शर्माने भारताकडून १५९ टी-२० मॅच खेळल्या आहेत. रोहितने ३१.३४च्या सरासरीने आणि १४०.८९च्या स्ट्राइक रेटने ४ हजार ३२१ धावा केल्या आहेत. १२१ ही त्याची सर्वोत्तम खेळी असून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५ शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. टी-२० मध्ये रोहितने २०५ षटकार मारले आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-29T21:59:03Z dg43tfdfdgfd