T20 WORLD CUP 2024 : पाकिस्तान संघासमोर मोठे आव्हान; वर्ल्डकप मधून आऊट होताच खेळाडूंच्या मानधनात कपात

न्यूयॉर्क: वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेच्या गटातच बाद होण्याची नामुष्की आलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंची पगारकपात होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी प्रत्येक खेळाडूच्या वार्षिक कराराचेही पुनरावलोकन केले जाणार आहे. नवखा अमेरिका क्रिकेट संघ तसेच, पारपंरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला. ‘सुपर ८’ फेरीतील प्रवेश हुकला.

पाकिस्तान क्रिकेट संघास ‘घरचा अहेर’ मिळतो आहे. आजी, माजी खेळाडूंनी कठोर शब्दांत बाबर आणि कंपनीवर टीका केली आहे. पगारकपातीची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) विश्वासू सूत्राकडूनच मिळते आहे. बोर्डातील पदाधिकारी आणि काही माजी खेळाडूंनी सध्याचे पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना खेळाडूंच्या कराराचे पुनर्मूल्यांकन करण्याचा सल्ला दिला आहे. माजी अध्यक्ष झाका अश्रफ यांच्या कालावधीत खेळाडूंना हे वार्षिक करार देण्यात आले होते.

अध्यक्ष नक्वी यांनी जाहीर

‘अध्यक्ष मोहसिन नक्वी खेळाडूंच्या अपयशामुळे साहजिकच नाराज आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या कराराचे पुनर्मूल्यांकन होण्याची शक्यता असून पगारकपातीचा अंदाजही आहे’, असे संबंधित सूत्राने सांगितले. गेल्यावर्षी माजी अध्यक्ष झाका अश्रफ यांच्या कार्यकाळात पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पगारात घसघशीत वाढ झालीच, शिवाय पाकिस्तानला आयसीसीकडून मिळणाऱ्या कमाईच्या वाट्यातील हिस्साही खेळाडूंना मिळण्याची तरतूद करण्यात आली. एवढेच काय, पण ‘टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यास खेळाडूंना एक लाख डॉलरचे बक्षीस देऊ,’ असे सध्याचे अध्यक्ष नक्वी यांनी जाहीर केले होते.

आता लीगमधील सहभाग मर्यादित

व्यावसायिक टी-२० लीगसाठी ना हरकत प्रमाणपत्र धोरणाची (एनओसी) अंमलबजावणी पीसीबीतर्फे करण्यात येणार आहे. या धोरणाअंतर्गत बोर्डाशी करार झालेल्या खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट लीग व्यतिरिक्त एका वर्षात परदेशातील दोनच व्यावसायिक लीगमध्ये भाग घेता येईल. तसेच, खेळाडू टी-२० लीगमध्ये भाग घेण्याच्या मोहात फिटनेस आणि कार्यभाराच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळल्यास कोणत्याही क्षणी दिलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ रद्द करण्याचा अधिकारही राखून ठेवण्याचा विचार पीसीबी करत आहे. हे नवे धोरण पाकिस्तान संघाच्या बोर्डाशी करारबद्ध खेळाडूंसह देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंनाही लागू होणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-16T09:38:25Z dg43tfdfdgfd