WASIM AKRAM: वसीम अक्रम संतापले; भारतविरुद्ध लाजिरवाण्या पराभवावर पाकिस्तान संघाला खडेबोल सुनावले

मुंबई: टी- २० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानकडून विजय हिसकावून घेतला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेला हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी लाखोंची गर्दी केली. पाकिस्तानने हातातला सामना गमावल्याने चाहते आणि माजी पाकिस्तानी खेळाडू पाकिस्तान संघावर भडकले आहेत. माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वासिम अक्रम यांनी पाकिस्तान संघाला टोला लगावला आहे.

वसीम अक्रम पाकिस्तान संघावर भडकले

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी पाकिस्तान संघाला सुनावले, पाकिस्तानच्या संघातील खेळाडू गेल्या दहा वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे त्यामुळे मी त्यांना काही शिकवू शकत नाही, जसप्रीत बुमराह हा विकेट घेण्यासाठीच गोलंदाजी करत होता ना, हे मोहम्मद रिझवानला माहिती नाही का, बुमहार गोलंदाजीसाठी आल्यानंतर रिझवानने सावध राहायला हवे होते मात्र, मोठा फटका मारायला गेला आणि तो बाद झाला, इफ्तिखार अहमदनेही हेच केले".

शेवटच्या दोन षटकांचा थरार

पाकिस्तानला विजयासाठी १२ चेंडूत २१ धावांची गरज असताना जसप्रीत बुमराहने १९ वे आणि अर्शदीप सिंगने २० वे षटक टाकले. १९ व्या षटकांत बुमराहने एक विकेट घेत फक्त ३ धावा दिल्या त्यामुळे शेवटच्या षटकांत पाकिस्तानला विजयासाठी १८ धावांची गरज होती.अर्शदीपने पहिल्याच चेंडूत इमाद वसीमला बाद केले. यानंतर नसीम शाहने आक्रमक फटकेबाजी करत दोन चौकार लगावले, पण अर्शदीपच्या भेदक माऱ्यासमोर तोही अपयशी ठरला आणि अर्शदीपने २० व्या षटकांत ११ धावा देत एक विकेट काढली.

पाकिस्तानवर भारताचे पारडं जड

टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. २०२४ पूर्वी दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सात सामने खेळले गेले होते, त्यापैकी सहा वेळा भारतीय संघ विजयी झाला मात्र या विजयानंतर टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजय विक्रम ७-१ असा झाला आहे. या पराभवामुळे पाकिस्तान संघाला आता सूपर- ८ फेरी गाठणे अवघड झाली असून इतर संघांवर अवलंबून रहावे लागणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-11T02:48:29Z dg43tfdfdgfd