T20 WORLD CUP 2024: सेमीफायनल खेळण्याआधीच टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज; दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने मिळणार...

त्रिनिदाद: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलमध्ये धडक मारून सर्वांचे मन जिंकणाऱ्या अफगाणिस्तान संघाला फायनलमध्ये जाता आले नाही. क्रिकेट विश्वात चोकर्सचा शिक्का असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने सेमीफायनल लढतीत अफगाणिस्तानचा ९ विकेटनी पराभव केला आणि प्रथमच वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान संघाचा पराभव झाला असला तरी त्यांच्या या कामगिरीवर सर्व क्रिकेट विश्वाला अभिमान वाटतो.

दुसरीकडे अंतिम फेरीत पोहोचलेली दक्षिण आफ्रिकेची लढत भारत आणि इंग्लंड यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध होणार आहे. वर्ल्डकपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने शानदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानचा फक्त ५६ धावांवर ऑलआऊट केला आणि विजयाचे लक्ष्य ८.५ ओव्हरमध्ये पार केले.

आयसीसी स्पर्धेच्या कोणत्याही स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचण्याची दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच वेळ आहे. आता सर्वांना प्रतिक्षा असेल ती दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कोण विजेता होईल याची. वर्ल्डकपमधील दुसरी सेमीफायनल भारत आणि इंग्लंड यांच्यात आज भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ८ला मॅच होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने भारताला आनंद

भारतीय क्रिकेट संघ अद्याप फायनलमध्ये पोहोचलेले नाही. मात्र त्याआधी संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध फार चमकदार कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही संघात वर्ल्डकपमध्ये झालेल्या ६ पैकी ४ लढती भारताने तर २ दक्षिण आफ्रिकेने जिंकल्या आहेत.

२०१४च्या टी-२० वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारताची लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाली होतो. या लढतीत भारताने ६ विकेटनी विजय मिळवला होता. एकूणच दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्धची कामगिरी फार चांगली नाही. जर भारताने सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली तर आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा आत्मविश्वास अधिक असेल.

भारताची कसोटी

वर्ल्डकपमध्ये आज भारताची इंग्लंडविरुद्ध लढत होणार आहे. दोन्ही संघात २०२२च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलची लढत झाली होती तेव्हा इंग्लंडने भारताचा १० विकेटनी पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. आज भारत त्या पराभवाचा बदला घेतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-27T11:19:09Z dg43tfdfdgfd