WI VS ENG:फिल सॉल्टची तुफानी खेळी; सुपर-८ मध्ये इंग्लंडचा दमदार विजय; वेस्ट इंडिजला चारली धुळ

मुंबई: सुपर-८ मधील दुसरा सामना हा इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सेंट लुसियामधील बोसेजू स्टेडियमवर रंगला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ गडी गमावून १८० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने अवघ्या १७.३ मध्ये विजय मिळवला तर इंग्लंडने सामन्यावर नियंत्रण राखले आणि एकतर्फी विजय संपादन केले.

प्रथम फलंदाजी करायला मैदानात आलेल्या ब्रेंडन किंग २३ धावा करून निवृत्त झाला. यानंतर जॉन्सन चार्ल्स आणि निकोलस पूरन यांनी अनुक्रमे ३८ आणि ३६ धावा केल्या. कर्णधार पॉवेलने २११च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत पाच षटकारांसह ३६ धावा केल्या. शेवटी, शेरफेन रदरफोर्डने एक चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद २८ धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

लक्ष्याचा पाठलाग करत फिलिप सॉल्ट आणि कर्णधार जोस बटलर यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. ८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार बटलरने आपली विकेट गमावली तो दोन चौकरांसह २५ धावा करू शकला. यांनतर ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोईन अली १३ धावा करून बाद झाला.

फिल सॉल्टची तुफानी खेळी

यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना इंग्लंडची एकही विकेट काढता आली नाही. फिल सॉल्ट आणि जॉनी बेअरस्टोने नाबाद ९७ धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. सॉल्टने सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावा केल्या तर बेअरस्टोने पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ४८ धावा केल्या. इंग्लंडला वेस्ट इंडिजवर आठ विकेटने सहज विजय मिळवता आला. वेस्ट इंडिजने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले होते त्यामुळे या स्पर्धेतील हा त्यांचा पहिला पराभव आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-20T05:02:13Z dg43tfdfdgfd