'यापेक्षा 60-60 किलोचे दोन खेळाडू खेळवा,' पाकिस्तानी चाहते संतापले, बाबर आझमवर नेपोटिझमचा आरोप

पाकिस्तान संघात आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी आझम खानची (Azam Khan) निवड करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. आझम खान हा पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोईन खान यांचा मुलगा आहे. याचमुळे त्याची निवड झाल्याची टीका होत असताना आता त्याच्या परफॉर्मन्सने यात भर टाकली आहे. यामुळे चाहत्यांना त्याच्यावर टीका करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. 

इंग्लंडविरोधातील टी-20 सामन्यात विकेटकिपर-फलंदाज आझम खान 5 चेंडूत एकही धाव न करता बाद झाला. मार्क वूडने टाकलेल्या जबरदस्त चेंडूचा तो यशस्वीपणे सामनाही करु शकला नाही. पाकिस्तानने 19.5 ओव्हर्समध्ये 157 धावा केल्या. इंग्लंड संघाने फक्त 15.3 ओव्हर्समध्ये टार्गेट पूर्ण केलं. इंग्लंडने 7 विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला. 

आझम खानच्या फ्लॉप खेळीनंतर त्याच्यावर पाकिस्तानी चाहते संतापले आहेत. एका चाहत्याने एक्सवक कमेंट केली आहे की, 'आझम खान आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लाजिरवाणी बाब आहे'. तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलं आहे की, 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीशी संवाद साधत आझम खानच्या जागी 60-60 किलोचे दोन खेळाडू खेळवावेत'.

एका युजरने कमेंट केली आहे की, 'जोपर्यंत फिटनेसची काळजी घेत नाही तोपर्यंत कोणताही संघ आझम खानला खेळवणार नाही'. तर एकाने लिहिलं आहे की, 'आझम खान नेपोटिझमचं सर्वात योग्य उदाहरण आहे. येथे प्रत्येक विभागात मध्यस्थी सुरु आहे. त्याला संघात घेणाऱ्या निर्लज्ज लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. हे गुन्हेगारी कृत्य आहे, ही साधी चूक नाही'.

T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानला कॅनडा, भारत, आयर्लंड आणि यूएसएसोबत ग्रुप ए मध्ये ठेवण्यात आले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ 6 जूनपासून टेक्सास येथे यूएसए विरुद्ध खेळत स्पर्धेची सुरुवात करेल.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानच्या पराभवानंतर बोलताना बाबर म्हणाला, "पहिली सहा षटके आम्ही खूप चांगली खेळली. त्यानंतर, विकेट पडल्यामुळे वेग बदलला. आमच्या मधल्या फळीला वेग वाढवण्याची गरज आहे. तुम्हाला 2 ते 3 चांगल्या ओव्हर्सची गरज आहे. मधल्या काळात आणि इंग्लंडची गोलंदाजी खूप चांगली होती. आशा आहे की आम्ही विश्वचषकात असे खेळणार नाही. दुखापतींमुळे आम्ही काही बदल केले. आमचा पॉवरप्ले चांगला होता. आम्ही पॅचेसमध्ये चांगले क्रिकेट खेळलो आहे".

2024-05-31T12:59:41Z dg43tfdfdgfd