ROHIT SHARMA:"ते काम आमचे नाही तर आयसीसीचे..." इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी रोहित शर्माने केले मोठे व्यक्तव्य

मुंबई: टी-२० वर्ल्डकपच्या सेमी फायनल फेरीत इंग्लंडविरुद्ध भारत आमने सामने येणार आहे. २०२२मध्ये पार पडलेल्या सेमीफायनल फेरीत भारत व इंग्लंड आमनेसामने आले होते व तेव्हा टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. इंग्लंडने १० विकेट्सने टीम इंडियाला हरवले होते तर यंदा भारताला याचा बदला घेण्याची संधी आहे. गयाना नेशनल क्रिकेट स्टेडियमवर भारतविरुद्ध इंग्लंड असं सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता रंगणार आहे तर या सामन्या बाबतची एक भीती बोलून कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितली.

गयनाच्या जॉर्जटाउन येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल फेरीच्या लढतीसाठी कोणताही राखीव दिवस नाही. सामन्याच्या एक दिवस आधी पावसाने हजेरी लावली असून अनेक सामन्यात पावसाचे सावट पाहायला मिळाले. यावरच आता रोहित शर्मा म्हणाला की, “मला आशा आहे की सामना पूर्ण होईल, भारत परिस्थितीनुसार जुळवून घेण्यास तयार आहे.”

“परिस्थिती कोणाच्याही नियंत्रणात नाही,त्यामुळे काय होणार हे कुणालाच माहित नाही, मला फक्त एकच काळजी वाटते की जर सामना उशीरापर्यंत चालला तर आमची चार्टर्ड फ्लाइटची वेळ चुकणार चला ते पण ठीक आहे, कारण ते आमचे काम नाही,आम्हाला पुढच्या ठिकाणी पोहोचवणे ही आयसीसीसाठी आणि वेस्ट इंडिजच्या क्रिकेटसाठी खरंतर डोकेदुखी होईल कारण वेळेत पोहोचवणे गरजेचे आहे, आम्ही हा खेळ चांगला कसा खेळू शकतो आणि निकाल आमच्या बाजूने कसा वळवू शकतो यावर अधिक लक्ष केंद्रित करू, दोन चांगले संघ खेळणार म्हटल्यावर हा सामना मुळातच चांगला रंगणार आहे.”रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला.

रोहित पुढे म्हणाला, " इंग्लंडलाही भारतीय खेळाडूंप्रमाणेच वेस्ट इंडीज देशातील परिस्थितीबद्दल माहित आहे, यापैकी बरेच खेळाडू वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी खेळले असल्याने असे नाही की कोणत्यातरी संघाला जास्त फायदा होईल, मला माहित आहे की येथे अनेक इंग्लंड क्रिकेटपटू खेळले आहेत पंरतु दिवसअखेरीस तुम्हाला जिंकण्यासाठी चांगले क्रिकेटच खेळावे लागेल, अन्य गोष्टींचा फायदा होईल की नाही हे सांगू शकत नाही."

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-27T06:18:23Z dg43tfdfdgfd