रोहितला पुन्हा दुखापत; भारत-पाक सामन्यात टीम इंडियाचे टेन्शन वाढले, सलामीसाठी 'यांची' वर्णी लागण्याची शक्यता

न्यूयॉर्क: क्रिकेटप्रेमी आतुरतेने भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पाहत आहेत. हा सामना रविवारी (९ जून) होणार आहे. मात्र, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आयर्लंडविरूद्ध सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे या महासामन्याआधीच भारतीय संघाच्या डोक्यावर संकटाचे काळे ढग दिसत आहेत. टी-२० विश्वचषकात भारत आपला दुसरा सामना खेळणार आहे. तर आयर्लंडविरूद्ध भारताने त्यांचा पहिला सामना खेळला होता. त्या सामन्यात असे काही झाले ज्याचा फटका भारताला आता बसणार का? अशा चर्चा होत आहेत.

पाकिस्तानच्या संघाची टी-२० विश्वचषकातील सुरूवात अत्यंत खराब पद्धतीने झाली आहे. टी-२० ची मोहिम सुरू होण्याआधीच पाकिस्तानला या ना त्या कारणामुळे टिकेला सामोरे जावे लागत होते. पाकचा सलामी सामना यजमान अमेरिकेसोबत झाला होता. या सामन्यात पाकला लाजिरवाण्या पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे पाकिस्तान चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. तर याआधी पाकिस्तानच्या संघाला इंग्लंड दौऱ्यावर टी-२० मालिका गमवावी लागली होती. त्यामुळे पाक आता भारतीय संघासमोर काय करेल याकडे चाहत्यांच्या नजरा असतील.

रोहित शर्माला दुखापत

आयर्लंडविरूद्धसामन्यात कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या हाताला जोशुआ लिटलने टाकलेल्या चेंडुने दुखापत झाली. वेदनेने त्रस्त झालेल्या रोहितने लगेचच मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संघाचे फिजिओ लगेच त्याच्याकडे पोहोचले. चेंडू आदळल्यानंतर रोहितने ग्लोव्ह काढून अंगठ्याकडे पाहिले आणि फिजिओने त्याची तपासणी केली. तपासणीनंतर कर्णधार पूर्णपणे बरा झाला आणि त्याने पुन्हा सराव सुरू केला.

रोहित शर्मा नसेल तर सलामीसाठी कोण उतरणार?

मात्र तो आता पुन्हा एकदा जखमी झाल्याचे समजते. नेटवर सराव करताना रोहितच्या अंगठ्याला मार लागला आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार आता पाकविरूद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार की नाही हा प्रश्न उभा राहिला आहे. या बद्दल अद्याप बीसीसीआयकडून काही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान आता रोहित खेळला नाही तर टीम इंडियाची सलामी कोण देणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कोहलीसह संजू सॅमसन किंवा यशस्वी जैस्वाल हे सलामीसाठी येऊ शकतात. यशस्वीने अनेक सामन्यांमध्ये सलामी दिली आहे. त्याचा रेकॉर्ड चांगला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ९ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. हा सामना भारतासाठी महत्त्वाचा असेल तसेच रोहित सारख्या अनुभवी खेळाडूचे मैदानावर होणे आवश्यक असेल. त्यामुळे रोहितची दुखापत फारशी गंभीर नसावी अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-08T15:24:12Z dg43tfdfdgfd