T20 WORLD CUP 2024 : बाबर आझम लोकांना मूर्ख बनवतोय, पाकिस्तानच्या खेळाडूने केला गंभीर आरोप

न्यूयॉर्क : टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये पाकिस्तानची सुरूवात काही खास झालेली नाही. पाकिस्तानला सलग दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी कॅनडासारख्या संघावर विजय मिळवला. पण त्यानंतरही पाकिस्तानी संघावर बरीच टीका होत आहे. आता तर पाकिस्तानचा क्रिकेटपटू अहमद शहजादनेही पाकिस्तानी संघावर जोरदा टीका करताना कर्णधार बाबर आझमला धारेवर धरले आहे. बाबरने लोकांना मूर्ख बनवले असल्याचा गंभीर आरोप शहजादने आता केला आहे.

अहमद शहजाद एका टीव्ही शोमध्ये म्हणाला की, "बाबर आझम कर्णधार झाल्यापासून पाकिस्तानच्या संघाची दुर्दशा झाली आहे. कारण पाकिस्तानच्या संघाला कोणताही संघ पराभूत करून दाखवत आहे. पाकिस्तानच्या संघाची आतापर्यंत जी वाटचाल आहे, ते पाहता त्यांना टी-२० वर्ल्ड कपमध्ये धक्के बसणारच होते आणि तेच आता दिसते आहे. पाकिस्तानच्याच संघात असे काही खेळाडू आहेत जे गेल्या ४-५ वर्षांपासून खेळत आहेत आणि त्यांच्यामुळे संघाला धोका असल्याचे दिसत आहे. भारताविरुद्ध पाकिस्तानला १२० धावा करायच्या होत्या, पण तरीही त्यांना सामना जिंकता आला नाही. यासाठी जबाबदार कोण, हे समोर आलेच पाहिजे."

शहजादने कर्णधार बाबरवर निशाणा साधत म्हटले की, "तुम्ही कमकुवत संघांबरोबर विजय मिळवले आणि चाहत्यांची तुम्ही दिशाभूल केली आहे. बाबरने पाकिस्तानी जनतेला मूर्ख बनवले आहे. बाबरने लोकांना मूर्ख बनवून आपल्या मित्रांसोबत एक टीम तयार केली आहे. ही टीम देशासाठी नाही तर स्वत: साठी खेळत आहे. बाबर मोठ्या स्पर्धांमध्ये किती धावा करतो, हे एकदा पाहा. बाबरची सरासरी २७ आणि स्ट्राईक रेट ११२ आहे. बाबर जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण तरीही मोठ्या स्पर्धेत तो संघाला सामना जिंकवून देऊ शकलेला नाही. ही सर्व बाबरने चाहत्यांची केलेली फसवणूक आहे, असे मला वाटते."

पाकिस्तानच्या संघाला अमेरिका आणि भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले होते. तर पाकिस्तानला भारताविरुद्धही जिंकता जिंकता ६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पाकिस्तानी संघाला आता सुपर-८ मधून बाहेर पडणार असल्याचे दिसत आहे. पण या सर्व गोष्टींना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम असल्याचा आरोप शहजादने केला आहे.

पाकिस्तानने मंगळवारी (११ जून) झालेल्या कॅनाडाविरूद्ध सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानची टी-२० विश्वचषकातील आव्हान अजूनही कायम आहे. मात्र पाकिस्तानला पुढील दोन्ही सामन्यांत विजय मिळवावा लागेल, पण तरीही त्याला अमेरिकेच्या सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. कारण अमेरिकेचा सामना पाकिस्तानसाठी निर्णयाक ठरणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-13T17:43:15Z dg43tfdfdgfd