AUS VS AFG: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेलने भारताला दिला इशारा; अफगाणिस्तानकडून लाजिरवाण्या पराभवानंतरही टीम इंडियाला डिवचले

सेंट विसेंट, किंग्सटाउन: टी-२० वर्ल्डकप २०२४मधील सर्वात आश्यर्यचकित करणारा सामना हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात रंगला. अफगाणिस्तानने या सामन्यात सर्वात मोठा अपसेट केला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी २१ धावांनी दिग्गज खेळाडू असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारली. सहा वेळा विश्वविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाने सामना गमावल्यानंतर कर्णधार मिचेल मार्शने टीम इंडियाला पुढील खेळासाठी चेतावणी दिली.

आता सुपर-८ मध्ये ऑस्ट्रेलियाचा शेवटचा सामना भारताविरुद्ध बोसेजु स्टेडियमवर रंगणार आहे. सेमी फायनल फेरीत प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागणार असून जर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा सामना गमावला तर ते वर्ल्डकपमधून बाहेर पडणे निश्चित होईल. हे लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार मिचेलने सामन्यापूर्वी टीम इंडियाला इशारा दिला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सोमवार, २४ जून रोजी खेळला जाणार आहे.

मिचेलने टीम इंडियाला दिला इशारा

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल म्हणाला, "सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आम्हाला आमचा पुढचा सामना हा भारतासोबत असणार आहे आणि अटीतटीच्या सामन्यात भारतापेक्षा चांगला संघ असू शकत नाही, कारण आम्हाला भारताविरुद्ध विजयाची नोंद करायची आहे, आजच्या सामन्यात आम्ही कदाचित अफगाणिस्तानला आणखी २० धावा करू दिल्या, या स्पर्धेत अनेक संघांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, नाणेफेक जिंकल्यामुळे किंवा हरल्यामुळे सामन्यावर परिणाम होतो असे काही मला वाटतं नाही यावर माझा विश्वास नाही, आजचा दिवस आमच्यासाठी मैदानावर चांगला नव्हता, या विकेटवर खेळणे सोपे नव्हते, पण दोन्ही संघ त्यावर खेळले,आम्ही चांगली कामगिरी केली नाही."

दुसरीकडे, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने ऐतिहासिक विजयानंतर सांगितले की, "संघाला गेल्या दोन वर्षांपासून अश्या गौरवशाली क्षणाची कमी भासत होती, एक संघ आणि देश म्हणून आमच्यासाठी हा मोठा विजय आहे, ही एक अद्भुत अनुभूती आहे जी गेल्या दोन वर्षांपासून आमच्या हाती लागत नव्हती, या विजयामुळे मी खूप खूश आहे आणि माझ्या खेळाडूंचा मला अभिमान आहे, या विकेटवर १४० धावांची धावसंख्या चांगली होती पण आम्ही फलंदाजीमध्ये तशी कामगिरी करू शकलो नाही, आमच्या सलामीच्या फलंदाजांनी आम्हाला चांगली सुरुवात करून दिली, आमच्या संघाची खासियत ही आहे की आमच्याकडे चांगले अष्टपैलू खेळाडू आणि उत्तम पर्याय आहेत."

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-23T10:03:44Z dg43tfdfdgfd